Home > News Update > एनसीबीला गांजा आणि तंबाखूतला फरक कळत नाही: नवाब मलिक

एनसीबीला गांजा आणि तंबाखूतला फरक कळत नाही: नवाब मलिक

एनसीबीला गांजा आणि तंबाखूतला फरक कळत नाही: नवाब मलिक
X

एनसीबी विरोधी एनसीपी असा संघर्ष आता वाढीला लागला असून आज पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक यांनी त्यांचे जावई समीर खान च्या अटकेसंदर्भात एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत एनसीबीला गांजा आणि तंबाखुतला फरक कळत नाही, असं म्हटलं आहे.

२ ऑक्टोबरला मुंबईजवळच्या एका क्रूझवर छापा टाकून शाहरुख खान पुत्र आर्यन खान आणि इतरांना अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी हा सगळा एनसीबीनं केलेला बनाव असल्याचा आरोप केला होता. यासंबधीचे व्हिडीओ आणि पुरावे त्यांनी मागील पत्रकार परीषदेत प्रसिध्द केले होते.

त्यानंतर विरोधी पक्षानं एनसीबीच्या बाजूने या वादात उडी घेत नवाब मलिकांचे दुखणे वेगळे असल्याचे म्हटलं होतं. आज नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची कोर्टातून जामीनावर सुटक झाल्यानंतर मलिक यांनी पुन्हा एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मलिक पत्रकार परीषदेत म्हणाले, १३ जानेवारी २०२१ रोजी माझे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. आर्यन प्रमाणेच तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं एनसीबीकडून सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आह, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.यावेळी नवाब मलिक यांनी एसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले. तसेच, संबंधित अधिकाऱ्याचा फोन नंबर देखील दाखवला.

कोर्ट ऑर्डरमध्ये २०० किलो गांजा मिळालेला असं स्पष्ट म्हटलं आहे. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको आहे असं रिपोर्टमध्ये आलं आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचं किट असतं. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजतं. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आलं. २७ अ चं कलम लागूच होत नाही. शाहिस्ता फर्निचरवालावर खटला दाखल होतो. पण तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला. रिया चक्रवर्ती प्रकरणात देखील करण सजनानीला गुंतवलं होतं. राहिला फर्निचरवाला या आरोपीला देखील गुंतवलं. रिया चक्रवर्ती प्रकरणातल्या एका आरोपीला या प्रकरणात टाकलं, असे एकापाठोपाठ धक्के मलिकांनी एनसीबीला दिले.

असा होता घटनाक्रम :

८ जानेवारी २०२१ रोजी एनसीबीनं पत्रकारांना सांगितलं की दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोमधून जप्त करण्यात आले. जे करण सजनानीनं विजय शर्मा नावाच्या एका व्यक्तीकडे शिलाँगला पाठवायला बुक केलं होतं. ९ जानेवारीला वांद्र्यात करण सजनानीच्या घरी छापा टाकला आणि एनसीबीनं प्रेस रिलीज काढून २०० किलो गांजा जप्त केल्याची माहिती दिली. त्याच दिवशी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या नंबरवरून प्रेस रिलीज आणि ४ फोटो पाठवले गेले. याच नंबरवरून सगळ्यांना मेसेजेस पाठवले गेले. ९ जानेवारीला शाहिस्ता फर्निचरवाला नावाच्या मुलीकडे ७.५ ग्रॅम गांजा सापडला. तिला त्याच दिवशी जामीन दिला गेला. नवी दिल्लीत प्रिन्स पान, हाऊस ऑफ पान, रॉइस पान नोएडा, सांजा पान गुडगाव, नितीन बँगलोर, मुच्छड पानवाला याच्याकडे छापा टाकला गेला", असं मलिक म्हणाले.

त्यानंतर १२ तारखेला रात्री समीर खान यांना एनसीबीचं समन्स मिळालं आणि १३ तारखेला १० वाजता बोलावण्यात आलं. समीर खान एनसीबी कार्यालयात पोहोचले. संध्याकाळपर्यंत माहिती आली की २७ अ कलमांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. जेल कस्टडीनंतर आमची जामीन याचिका रद्द झाली. ६ महिने पूर्ण झाले तेव्हा सुनावणी झाली आणि एनसीबीनं तेव्हा चार्जशीट फाईल करतो असं सांगितलं. कनिष्ठ न्यायालयात आम्ही जामीन याचिका दाखल केली. साडेतीन महिने एनसीबीनं टाळाटाळ केली. पण शेवटी जामीन मिळाला", असे ते म्हणाले.

२७ तारखेला एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात समीर खान आणि त्याच्यासोबतच्या दोन इतर आरोपींना साडेआठ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर जामीन दिला गेला. काल सकाळी ११ वाजता कोर्टाच्या ऑनलाईन पोर्टलवर तो आदेश अपलोड झाला. माझ्या जावयाला साडेआठ महिने जेलमध्ये राहावं लागलं. माझी मुलगी मानसिक धक्क्यामध्ये होती. त्यांच्या दोन लहान मुलांवर परिणाम झाला", असं देखील नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

सर्व चॅनल्सवर मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाल्याचं दाखवलं जात होतं. पण घराच्या तपासणीत असं काहीही सापडलं नाही. पण माध्यमांना तसं सांगितलं गेलं. लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी बनाव करते. या प्रकरणात एनसीबीचा हा सगळा बनाव उघड झाला आहे, अशा शब्दात नवाब मलिकांनी एनसीबीची पोलखोल केली आहे.

Updated : 14 Oct 2021 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top