Home > News Update > शरद पवार राज्यपालांच्या भेटीला, दिल्लीश्वरांच्या मनात काय?

शरद पवार राज्यपालांच्या भेटीला, दिल्लीश्वरांच्या मनात काय?

शरद पवार राज्यपालांच्या भेटीला, दिल्लीश्वरांच्या मनात काय?
X

सध्या राज्याचं सत्ता केंद्र राजभवन झालं आहे का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विरोधी पक्ष नेते वारंवार राज्यपालांची भेट घेत आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील नेते देखील वारंवार राज्यपालांची भेटीला जात असल्यानं दिल्लीश्वरांच्या मनात काय सुरु आहे? असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे. कारण राज्यपाल जे काही करत असतात. त्या मागे केंद्राची भूमिका असते. हे वारंवार घडलेल्या घटनांवरुन आपल्या लक्षात आलंच असेल.

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकी बाबतही राज्यपालांनी ‘तुम्ही पंतप्रधानांना फोन करा’. असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. आणि राज्यात विधान परिषद निवडणूक झाली.

एवढेच काय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यामुळं राज्यपाल सध्या कोणत्या भूमिकेत आहेत. तसंच राज्यपालांचं पारड कोणत्या बाजूला झुकत आहे? हे वेगळं सांगायला नको.

नुकताच राज्यातील शेवटच्या वर्षांच्या परीक्षांबाबत मोठा वादंग देखील निर्माण झाला होता. याव्यतिरिक्त येत्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांवर सरकारला प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढताना दिसत असताना राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

काल परवाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीने बैठक झाली होती. या बैठकीला राज्यपालांची भेट घेऊन आलेले संजय राऊत देखील उपस्थित होते विशेष.

आजची विशेष बाब म्हणजे आज स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल देखील सोबत होते. हे दोन ही नेते राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या दोनही नेत्याचं भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळं दिल्लीच्या मनात महाराष्ट्राबाबत नक्की काय सुरु आहे? या बाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

तर दुसरीकडे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शरद पवार यांना चहापानासाठी निमंत्रित केले होते. असं सांगण्यात आलं आहे. तरीही शरद पवार यांच्या हातातील फाईल सर्व काही सांगून जाते. चहा पानासाठी गेलेल्या शरद पवारांच्या हातात फाईल कशासाठी? या फाईल मध्ये नक्की काय आहे? हे येणारा काळचं सांगेल.

मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपालांची नियुक्ती झाल्यानंतर शरद पवार आणि राज्यपालांची भेट झाली नव्हती. म्हणूनच आज शरद पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं पटेल म्हटलं आहे.

Updated : 25 May 2020 8:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top