Home > News Update > नवनीत राणांची 'पोलखोल'; पोलिस आयुक्तांनी केला दाम्पत्याला चहापानाचा व्हिडीओ ट्विट!

नवनीत राणांची 'पोलखोल'; पोलिस आयुक्तांनी केला दाम्पत्याला चहापानाचा व्हिडीओ ट्विट!

नवनीत राणांची पोलखोल; पोलिस आयुक्तांनी केला दाम्पत्याला चहापानाचा व्हिडीओ ट्विट!
X

राज्याच्या राजकारणात गेले काही दिवस धुमाकुळ घालणाऱ्या राणा दाम्पत्यामधील नवनीत राणांच्या आरोपाला पोलिस आयुक्तांचे एका वाक्यात आणि व्हिडिओमध्ये उत्तर दिले आहे. त्यामुळे खातरजमा न करता आरोप करणारे फडणवीसही तोंडावर पडले; जबाबदार पदाचे भान न ठेवता केलेला उतावीळपणा फडणवीसांच्या अंगाशी, इतकी अस्वस्थता येतेय कशातून? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर मागासवर्गीय असल्याने पाणी न दिल्याचा व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याचा पोलिस ठाण्यातला चाहापानाचा व्हिडीओ ट्विट करत पोलखोल केली आहे. या व्हिडिओत नवनीत राणा या आरामात चहापान करताना स्पष्ट दिसत आहेत.

प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असून त्यांनीदेखील याची दखल घेत २४ तासात सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे.

मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घऱाबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. आणि मी तेवढंच करणार होते. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या. मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. त्याऐवजी माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे," अशी माहिती नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.

पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे, नवनीत राणांचा आरोप आहे.

तसेच मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. या आरोपांना पत्रकार परीषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही दुजोरा दिला होता.

नवनीत राणाच्या लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या ईमेल नंतर अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ओम बिर्ला यांनी २४ तासात ही माहिती सोपवण्यास सांगितलं आहे.

नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाच्या मार्फत ही माहिती मागवण्यात आली आहे.

मुंबई पोलिस आयुक्त संजय पाडे यांनी राणा दाम्पत्यांचे आरोप यापूर्वीच फेटाळले आहेत. आता त्यांनीच हा पोलखोल व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत राणा दाम्पत्य चहापान करताना दिसत आहे. राणा दाम्पत्य बसलेल्या टेबलावर बिस्लेरी कंपनीची पाण्याची बॉटल आणि चहा पण स्पष्ट दिसतोय. या पोलखोलमुळे राणा दांपत्याबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षाचेही हसे झाले आहे. त्यांचा उतावीळपणा आणि खोटारडेपणा जगासमोर आला आहे. दरम्यान, कालच मुंबई हायकोर्टाने पदाचे भान राखून जबाबदारीने वागा, अशा शब्दात लोकप्रतिनधींचे कान उपटले होते.

Updated : 26 April 2022 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top