Home > News Update > पैसे द्या, दुचाकी बर्बाद करून घ्या

पैसे द्या, दुचाकी बर्बाद करून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात नियोजित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. मात्र हा दावा कसा फोल आहे? हे उघड करणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अतुल गोडसे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

पैसे द्या, दुचाकी बर्बाद करून घ्या
X

कामोठे- कळंबोली येथील कामगार आणि नोकरदार वर्ग मुंबई मध्ये नोकरीसाठी जातो. वेळ वाचावा म्हणून घरापासून रेल्वेस्थानका पर्यंतचा प्रवास आपल्या दुचाकीनं करतात. मात्र, कामोठे-मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी पार्किंगसाठी जागेचा तुटवडा भासत आहे. रेल्वे स्थानक परिसरात एकच अधिकृत पार्किंग असून हीच पार्किंग नागरिकांसाठी समस्या झाली आहे. पार्किंग मध्ये उद्भवणाऱ्या समस्यांना त्रस्त होऊन नागरिक रेल्वे स्थानक परिसरातील रोड वर पार्किंग करत आहेत, त्यामुळं पार्किंगची समस्या अधिकच बिकट झालीय.



कामोठे-मानसरोवर स्टेशनजवळची पार्किंगची जागा ही सिडकोच्या मालकीची आहे. टेंडरद्वारे संभाजी चिपळेकर यांच्या संस्थेला पार्किंग चालवण्यासाठीचं कंत्राट मिळालंय. मात्र, पार्किंगमधल्या सुविधांकडं पाहिल्यावर लक्षात येतं की, इथं फक्त कागदोपत्रीचं पार्किंग चालवलं जातंय. कुंपण फक्त नावालाचं आहे, रात्रीच्या वेळी लाइटची पुरेशी व्यवस्था नाही.

क्षमतेपेक्षा जास्त गाड्यांची पार्किंग केली जाते. पार्किंगच्या जागेतच कचरा मोठ्याप्रमाणावर आहे. पार्किंगच्या जागेतच विनापरवाना छोट्या व्यावसायिकांनी आपलं दुकान टाकलंय. वाहनांच्या पार्किंगसाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं नाही. वाटेल त्या ठिकाणी दुचाकी पार्किंग केल्या जातात. त्यामुळं कधी-कधी दुचाकी एकमेकांना घासून दुचाकींचं नुकसान होतंय. रात्रीच्या वेळेस उंदीर व घुस दुचाकीची वायरिंग खाऊन नुकसान करत असल्याचे तेथील नागरीक सांगत आहेत.

काही नागरिकांनी यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रकडे तक्रार केली. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याविषयी पाहणी केली.

मॅक्स महाराष्ट्रनं पनवेल महापालिकेच्या प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर वॉर्ड ऑफिसर अरविंद पाटील यांनी आमच्यासोबत कामोठे-मानसरोवर रेल्वे स्टेशन इथल्या पार्किंगच्या ठिकाणी भेट दिली आणि अनधिकृतपणे व्यवसाय करणा-या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली.

पार्किंगमधील अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्यात आली मात्र वाहनचालकांना अजूनही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे कामोठे-मानसरोवर येथे पार्किंगमधील समस्या सोडवण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रची मोहिम सुरुच राहणार,

Updated : 10 May 2023 1:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top