Home > News Update > 'या' घटनेतून धडा घेणार रुग्णालयातील भेटीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया...

'या' घटनेतून धडा घेणार रुग्णालयातील भेटीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया...

या घटनेतून धडा घेणार रुग्णालयातील भेटीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया...
X

कोरोनाचा फैलाव वाढत असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. या दुर्घटनेत २२ रुग्णांना आपला प्राण गमावावा लागला. आज या घटनास्थळी पालकमंत्री छगन भूजबळ यांनी भेट दिली. यावेळी भूजबळ यांनी माध्यमांशी बातचीत केली.

कोरोना विरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे. या रुग्णालयाची क्षमता एकूण १५० इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होते.

त्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होते. १२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडली. त्यानंतर १.३० वाजेपर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आली.

या दरम्यान दुर्दैवाने यात २२ लोक मृत्युमुखी पडले असुन ११ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर ११ ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे.

कोरोना विरुद्ध लढाई लढत असतांना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार.समितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ,आणि एक सिनियर डॉक्टरचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासन व नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी ५ लक्ष रुपयांची मदत करण्यात येईल. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

आपलं काम थांबणार नाही. अधिक नियोजन करून लढा सुरू राहील. या घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या लढाईत नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Updated : 21 April 2021 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top