Home > News Update > आघाडी सरकारनेही पेट्रोल , डिझेलवरील करात कपात करावी - डावखरे

आघाडी सरकारनेही पेट्रोल , डिझेलवरील करात कपात करावी - डावखरे

आघाडी सरकारनेही पेट्रोल , डिझेलवरील करात कपात करावी  - डावखरे
X

ठाणे : केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्याने आता राज्य सरकारनेही पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीचे आमदार व ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात कपात करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल - डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे , अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे.

मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही. यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते , असेच सिद्ध होते. भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील २२ राज्ये , केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी , असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले यांचा समावेश होता.

Updated : 12 Nov 2021 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top