Home > News Update > येवला येथील 'मुक्तीभूमी'ला राज्य शासनाकडून 'ब' वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा

येवला येथील 'मुक्तीभूमी'ला राज्य शासनाकडून 'ब' वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा

येवला येथील मुक्तीभूमीला राज्य शासनाकडून ब वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा
X

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या येवला मुक्तीभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 'ब' वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना ही विशेष भेट मानली जात आहे. याबाबत शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुक्तीभूमीला 'ब' वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने आता या ऐतिहासिक भूमीच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन यांनी दिली.

याबाबतचा प्रस्ताव मागील अनेक दिवसांपासून शासनाकडे प्रलंबित होता. दरम्यान या प्रस्तावाला आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मंजुरी देण्यात आली आहे, याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून येवला शहर हे नाशिक निफाड औरंगाबाद रस्ता व मालेगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर रस्त्यावरील एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे.

येवल्याच्या या भूमीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला असून , 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या जागेस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टिने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला नगरपरिषद क्षेत्रातील मुक्तीभुमीच्या जागेचा विकास केला आहे. याठिकाणी दरवर्षी 13 ऑक्टोबर, विजयादशमी, 14 एप्रिल तसेच प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी लाखो अनुयायी येत असतात.

येवल्यातील सदरची जागा ही 'मुक्तीभूमी' करिता आरक्षित आहे. याठिकाणचा विकास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आला आहे. सदर ठिकाणी देखभाल व दुरुस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे बार्टी या संस्थेमार्फत केली जाते. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुक्तीभूमीला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याने आता या तीर्थ स्थळाच्या विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे.

Updated : 6 Dec 2021 12:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top