Home > News Update > एसटी संपाचा तिढा आज सुटणार का?

एसटी संपाचा तिढा आज सुटणार का?

एसटी संपाचा तिढा आज सुटणार का?
X

गेली सतरा दिवस थांबलेलं एसटीचं चाक पुन्हा सुरु होणार की नाही यावर आज सकाळी मोठा निर्णय अपेक्षीत आहे. राज्य सरकारने ऐतिहासिक पगारवाढ घोषीत करुनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या पत्रकार परीषदेत संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंदोलक कर्मचाऱ्यांनी बुधवारची रात्रही आझाद मैदानातच काढली आहे. पण, आज यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता निर्णय घेऊ अशी माहिती शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिली.

काल दिवसभराच्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठी निर्णय घेतला. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा परीवहन मंत्री अनिल परब यांनी केली. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा काही निघाला नाही. सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी इन्सेटिव्ह योजना आणणार असल्याचं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत देण्याबाबत खबरदारी घेणार आसल्याचंही अनिल परबांकडून सांगण्यात आलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं, त्यानंतर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं. त्यानंतर पडळकर आणि खोत आझाद मैदानात पोहोचले. मात्र, तोपर्यंत अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली होती. त्यामुळे संपाबाबत गुरुवारी निर्णय घेऊ अशी माहिती सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?

1 ते 10 वर्षे सेवा- मूळ वेतनात 5 हजाराची वाढ, त्यामुळे मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्याचं वेतन आता 17 हजार 395 रुपये. त्याचं पूर्ण वेतन जे 17 हजार 80 रुपये होतं ते आता 24 हजार 594 रुपये झालं आहे. साधारण 7 हजार दोनशे रुपयांची म्हणजे एकूण 41 टक्के वाढ.

10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ. ज्यांचा पगार 16 हजार रुपये होता त्यांचा पगार 23 हजार 40 रुपये झाला. त्यांचा पूर्ण पगार आता 28 हजार 800 रुपये झालाय.

20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा – 2 हजार 500 रुपयांची वाढ. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल.


Updated : 2021-11-25T09:34:35+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top