कमलनाथ सरकार संकटात, 20 मंत्र्यांचा राजीनामा !
Max Maharashtra | 9 March 2020 6:41 PM GMT
X
X
देश होळी चा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करत असताना मध्य प्रदेशात राजकीय धुळवडीला सुरवात झाली आहे. कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक असलेल्या 20 आमदारांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा हात सोडत बेंगलोर गाठले आहे. या आमदारांमागे बंडखोर कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हात आहे. या 20 आमदारांमध्ये 6 मंत्र्यांचा देखील समावेश असल्याचं समजतंय. त्यामुळं मध्यप्रदेश मध्ये मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यातच कमलनाथ यांनी आज सकाळी या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर आज झालेल्या कॅबिनेट च्या बैठकीला आलेल्या सर्व मंत्र्यांनी कमलनाथ यांच्याकडे आपले राजीनामा सोपवले आहे.
कमलनाथ यांनी हे सर्व राजीनामे स्वीकारले असून पुन्हा नवीन मंत्री मंडळाची घोषणा करण्याची शक्यता आहे. हा कमलनाथ यांचा राजकीय डाव समजला जात असून या प्रयत्नातून त्यांना सरकार वाचवण्यात यश येते का? की स्वत: ला राजीनामा द्य़ावा लागतो. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्यापासून ते नाराज आहेत. त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात असताना मुख्यमंत्री पदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासून सिंधिया नाराज होते. त्यांनी देखील कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.
काय आहे मध्यप्रदेश विधान सभेचं गणित?
२३० जागा असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेत एकूण ११४ जागा काँग्रेसच्या आहेत. तर भाजपच्या १०७ जागा आहे. बसपाच्या २, समाजवादी पक्षाची १ आणि चार अपक्ष आमदार असं मध्यप्रदेश च्या विधानसभेचं राजकीय बलाबल आहे.
Updated : 9 March 2020 6:41 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire