Home > News Update > महाराष्ट्रात मान्सून सरासरीपेक्षा अधिकच कोसळणार

महाराष्ट्रात मान्सून सरासरीपेक्षा अधिकच कोसळणार

महाराष्ट्रात मान्सून सरासरीपेक्षा अधिकच कोसळणार
X

नैऋत्य मोसमी पावसाने नुकताच भारतात प्रवेश केला असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के म्हणजे सर्वसामान्य पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं (IMD)ने जाहीर केलं आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केले आहेत. हवामान विभागाने यापूर्वी १४ एप्रिलला मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढवून तो १०३ टक्के करण्यात आला आहे. त्यात चार टक्के कमी-अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीत भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी आहे. या सरासरीच्या तुलनेत मोसमाच्या चार महिन्यांत १०३ टक्के पाऊस देशात पडणार आहे.

याबाबत हवामतज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, भारतीय हवामान विभागाचा सुधारित अंदाज टक्केवारीच्या भाषेत पूर्वीच्या ९९ % ऐवजी १०३% पाऊस होण्याची शक्यता तसेच ' ला -निना ' व आय.ओ.डी. पावसासाठी अनुकूल वर्तवून देशातील शेतकऱ्यांच्या आशा अधिकच पल्लवीत केल्या आहेत.

महाराष्ट्रातील दुष्काळी तसेच पावसावरच अवलंबून असणाऱ्या सर्व जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात मात्र हा मान्सूनचा पाऊस सरासरी पेक्षा अधिक म्हणजे १०६ % पेक्षा अधिक पावसाची शक्यता असुन हा अधिक पाऊस लाभदायी कि नुकसानदेही ह्याचे उत्तर येणारा काळच देईल, असे वाटते. कोकण व घाटमाथा धरण क्षेत्रात तसेच जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस असण्याची शक्यता मात्र ४५% च आहे, असंही खुळे यांनी स्पष्ट केलं.

देशात ९६ ते १०४% असा सरासरी इतका पाऊस सांगतांना येत्या ४ महिन्यात महाराष्ट्रात मात्र नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद लातूर अमरावती वर्धा यवतमाळ जिल्ह्यात सरासरीपेक्षा खुपच अधिक म्हणजे १०६% पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ही ७५% इतकी जाणवते. म्हणजेच सरासरीपेक्षाच अधिक पाऊस होणार आहे. मान्सून च्या प्रगतीस अनुकूल वातावरण असुन संपूर्ण केरळ, द. तामिळनाडू ओलांडून कर्नाटकतील कारवार चिकमंगलूर बंगळूर धर्मापुरी पर्यंत पोहोचला असुन ३-४ जून पर्यंत गोव्यात पोहोचू शकतो. असे वाटते. बघू या..मान्सून वाटचाली दरम्यान आठवडाभर तरी सध्या कोणतेही च. वादळ निर्मितीचे संकेतही दिसत नाही. इतकेच वातावरणात विशेष बदल झाल्यास लिहिले जाईल, असं माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Updated : 31 May 2022 3:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top