मोदी सरकारनं हुमायूच्या मकबऱ्यावर १० वर्षात केला कोट्यवधींचा खर्च
Modi government spent crores on Humayun's Tomb in 10 years
X
भारतातील मुगल साम्राज्याशी निगडीत सर्वच वस्तू आणि वास्तूंना सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांचा विरोध असल्याचं मागील काही वर्षात प्रकर्षानं समोर आलंय. तर दुसरीकडे त्याच मुगल साम्राजाच्या काही स्मृतिस्थळांवर मागील काही वर्षात केंद्र सरकारनं कोट्यवधी रुपये खर्चही केल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.
अजय बासुदेव बोस यांनी माहिती अधिकाराच्या कायद्याचा वापर करत ही माहिती प्राप्त केलीय. त्यात दिल्लीतल्या हुमायूच्या मकबऱ्यावर भारतीय पुरातत्व खात्याच्या दिल्ली मंडळानं देखभाल दुरुस्ती आणि संवर्धनासाठी तब्बल ७ कोटी २९ लाख ९० हजार ३३५ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती १४ जानेवारी २०२६ रोजी दिलीय.
आजपासून सुमारे ५०० वर्षांपूर्वी बाबरनं भारतात टप्प्याटप्प्यानं आपलं मुगल साम्राज्य प्रस्थापित केलं. बाबरनं त्याचा मोठा मुलगा हुमायूनं ला आपला उत्तराधिकारी बनवला होता. बाबर हा त्याच्या सत्ताकाळात हिंदुविरोधी समजला जात होता. त्यामुळं आजही बाबर आणि त्याच्या वंशजांना विरोध करणारा एक मोठा समूह भारतात आहे. त्यातही भाजपच्या नेत्यांकडून बाबर आणि त्याच्या वंशजांना वेळोवेळी विरोधच केला जातो.
बाबरच्या सत्ताकाळात भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्या सत्तेच्या खाणाखुणा, स्मृतीसथळं आहेत. तशाच काही गोष्टी या दिल्लीतही आहेत. त्यात हुमायूचा मकबराही आहे. आता याच मकबऱ्याच्या संवर्धन, दुरुस्ती आणि देखभालीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं २०१४ ते २०२५ पर्यंत तब्बल ७ कोटी २९ लाख ९० हजार ३३५ रुपये खर्च केले आहेत. हिंदुविरोधी समजल्या जाणाऱ्या बाबरचा मुलगा हुमायूच्या मकबऱ्यावर भाजप सरकारकडून ७ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आलाय.
मोदी सरकारकडून हुमायूनच्या मकबऱ्यावर ७ कोटींपेक्षा अधिकचा खर्च
२०१४-१५ – २७ लाख ६ हजार
२०१५-१६ – २५ लाख ६७ हजार १०५
२०१६-१७ – ३२ लाख ९८ हजार ७८०
२०१७-१८ – ३४ लाख ८७ हजार ५२५
२०१८-१९ – २५ लाख ४४ हजार ६८६
२०१९-२० – ८६ लाख ३ हजार ९३७
२०२०-२१- ६६ लाख ३४ हजार २४२
२०२१-२२ – ५० लाख ६७ हजार १८७
२०२२-२३ – १ कोटी १५ लाख ३४ हजार ८५३
२०२३-२४ – १ कोटी १३ लाख २ हजार ४१४
२०२४-२५ – १ कोटी ५७ लाख ४३ हजार ६०६
हा हुमायू कोण होता ?
आजपासून सुमारे पाचशे वर्षांपूर्वी बाबरनं आपलं साम्राज्य उभं केलं होतं. १५२६ मध्ये पानीपतच्या पहिल्या लढाईमध्ये इब्राहिम लोधी याला हरवून बाबरनं भारतात एक नवं साम्राज्य उभं केलं होतं. त्यावेळी जगाच्या एक चतुर्थांश संपत्ती ही एकट्या बाबरची होती. अफगाणिस्तान सह उपमहाद्वीप पर्यंत बाबरचं साम्राज्य पसरलेलं होतं. याच बाबरला ४ मुलं होती. त्यापैकी हुमायू हा सर्वात मोठा होता, त्यालाच बाबरनं आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं. नसीरुद्दीन हुमायू चा जन्म १५०८ मध्ये झाला होता. २९ डिसेंबर १५३० मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी तो आगरा इथल्या सिंहासनावर विराजमान झाला होता. बाबरच्या मृत्यूनंतर हुमायूनं भारतातील साम्राज्याची सूत्रं हाती घेतली आणि आपल्या उर्वरित ३ भावांमध्ये सत्तेचं वाटप करुन टाकलं. चौसा इथंल युद्ध हुमायू हरला आणि युद्धभूमीतून पळून गेला. त्यानंतर त्यानं भारत देशही सोडला.






