मनसेचं इंजिन विजेवर धावणार
वीजबिलांच्या मुद्द्यावरुन मनसेने आता रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
X
लॉकडाऊनच्या काळात आलेले वाढीव वीजबिल माफ करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. वीजबिल माफीसाठी आम्ही राज्यपाल शरद पवार यांनाही भेटलो पण वीजबिल माफी झाली नाही, जनतेच्या असंतोषाचा बांध फुटू देऊ नका नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वाढीव वीजबिलांसंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. वीजबिलासंदर्भात माफी द्यावी अशी मागणी केली होती. पण प्रत्यक्षात वीज बिल माफी झाली नाही. त्यानंतर राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली आणि शरद पवार यांनाही निवेदन दिले. पण तरीही वीजबिल माफी न झाल्याने अखेरचा पर्याय म्हणून आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे नांदगावकर यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.
वीज कनेक्शन जर कोणी कापायला आलं तर त्यांना मनसे स्टाईलने रोखू असा इशाराही त्यांनी दिला आहे. भाजपबरोबर महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही एकत्र येणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, "भाजपने मनसेला सोबत घ्यायचं ठरवलं असेल तर ही चांगली गोष्ट आहे. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तसे ठरवले पाहिजे. जर त्यांनी ठरवलं असेल तर आम्ही एकत्र जाण्यास काही हरकत नाही, पण अखेरचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील" असंही त्यांनी स्पष्ट केले.






