#कोरोनाशी_लढा : ठाण्यात ‘मिशन झीरो’

Mission zero in Thane to stop increasing covid-19 cases in city

ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवसत वाढत असताना आता मिशन झीरो सुरू करण्यात आले आहे. सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत या मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले.

कोरोनाविरूद्धचा लढा यशस्वी करायचा असेल तर त्याची साखळी तोडण्याची गरज आहे तरच ‘मिशन झीरो’ ही मोहीम यशस्वी होईल असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

“कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण त्याच्या मागे लागले पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याची गरज आहे. हे जर झाले तर योग्यवेळी रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करता येतील आणि मृत्यूचा दर कमी करणे आपल्याला शक्य होईल” असे शिंदे यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज असून रुग्णसंख्या वाढली तरी हरकत नाही, पण योग्यवेळी रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. मनुष्यबळ वाढवण्याचेही आदेश शिंदे यांनी दिले.

क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगले जेवण, वेळेवर औषधे दिली जात आहेत. ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरविषयीची लोकांच्या मनातील भीती दूर होईल. रूग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये संपर्क करून द्या ज्यामुळे रूग्णांना मानसिक धीर मिळेल. त्यासाठी प्रभाग समिती स्तरावर नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या समित्या तयार करण्यासही शिंदे यांनी सांगितले आहे.

दरम्यान कोरोना बाधितांची संख्या वाढली तरी आमचे कोरोनावरील नियंत्रण सुटलेले नाही. आपण चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे ही संख्या वाढत आहे. पण त्यापैकी 80 टक्के बाधित रूग्ण हे असिम्टोमॅटिक आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही असे, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.

‘मिशन झीरो’ मोहीम देश अपनाये ही स्वयंसेवी संस्था, एमसीएचआय क्रेडाई आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांतून चालवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here