Home > News Update > महिलेच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये केली पेस्ट, राजकीय नेत्यांचा दावा, पोलिसांचा दुजोरा नाही

महिलेच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये केली पेस्ट, राजकीय नेत्यांचा दावा, पोलिसांचा दुजोरा नाही

मुंबईजवळील मिरा भाईंदर शहरात गीतानगरमध्ये एका महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.

महिलेच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये केली पेस्ट, राजकीय नेत्यांचा दावा, पोलिसांचा दुजोरा नाही
X

मिरा भाईंदरमधील गीतानगर फेज 7 मधील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेची तिच्या पार्टनरने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मनोज साने नावाच्या तिच्या पार्टनरने तिच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिरा रोड येथील गीतानगर फेज 7 या ठिकाणी एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर या जोडप्याने एक खोली भाड्याने घेतली होती. यामध्ये 56 वर्षीय मनोज साने व सरस्वती हे तीन वर्षांपासून तेथे लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आणि एका हत्येचा उलगडा झाला.

नयानगर पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच मनोज आणि सरस्वतीच्या घरी पोहचले. त्यावेळी घराला कुलूप लावलेले होते. पोलिसांनी कुलूप तोडले आणि अंगावर शहारे आणणारे दृष्य समोर दिसले.

मिरा भाईंदर येथील सरस्वतीच्या शरीराचे तुकडे घरात पडलेले दिसले. सरस्वतीचे पाय शरीरापासून वेगळे पडले होते.तसेच मनोजने सरस्वतीच्या शरीराचे तुकडे केले. त्याबरोबरच उर्वरित धडाची विल्हेवाट लावण्यात आली होती.

या प्रकरणात सरस्वतीचा पार्टनर मनोज साने या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने सरस्वतीच्या शरीराचे तुकडे कुठं फेकले? याचा तपास पोलिस करत आहेत, असे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत

सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही, अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावे, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

मॅक्स महाराष्ट्रने या प्रकरणी तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क केला. यावेळी तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनोज साने याने महिलेचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे केले आहेत. त्यातील काही भाग घरातच पडले होते. मात्र शरीराचा काही भाग मिळाला नाही. त्यामुळे हे तुकडे कुठे टाकले? याचा तपास आम्ही करत आहोत.

Updated : 8 Jun 2023 7:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top