Home > News Update > राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचा सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचा सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचा सत्कार
X

अहमदनगर : जिल्ह्यात मर्यादित क्रीडा सुविधा असताना अनेक खेळाडू पदक विजेते ठरले. त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणे यासाठी कायम सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम येथे आहे. येत्या काळात जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा आणि क्रीडा विकासासंबंधी प्रस्तावांचा सकारात्मक सहकार्य करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्‍पादन, क्रीडा व युवक कल्‍याण, राजशिष्‍टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्‍याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आणि जिल्हा क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षक, खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिक, जिल्हा क्रीडा संकुल समिती यांच्यावतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार संग्राम जगताप, प्रा.माणिक विधाते, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे आदी उपस्थित होते.

सुरुवातीला हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू प्राजक्ता नगरकर (ज्युदो), मनीषा पुंडे (ज्युदो), विलास दवणे (पॉवरलिफ्टींग), सतीश झेंडे (सायकलिंग),आप्पासाहेब ढूस (साहसी क्रीडा प्रकार), श्वेता गवळी ( खो - खो) सुनील जाधव ( कब्बडी) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदकविजेते खेळाडू प्रणिता सोमण, आदित्य धोपावकर, दिव्यांगी लांडे, वेदांत वाघमारे, वैष्णवी गोडळकर यांचाही गौरव राज्यमंत्री तटकरे यांनी केला.

यावेळी राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, क्रीडा व युवक कल्याण हा महत्वाचा विभाग आहे. युवकांच्या दृष्टीने महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी येते.या विभागाच्या माध्यमातून नगरच्या क्रीडा विकासासाठी कायम सहकार्य करण्याची भूमिका राहणार आहे.

रस्ते, वीज, पाणीपुरवठा याबरोबरच क्रीडा विकासासाठी मदत करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. खेलो इंडिया स्पर्धेत आपल्या राज्याने मागील दोन वर्षात चांगले यश मिळवले आहे. आपल्या राज्याने केंद्र सरकारकडे काही प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. नगर येथील नेमबाजी केंद्राचा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठविला असल्याचे त्या म्हणाल्या.

आमदार जगताप म्हणाले, नगर जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनाला क्रीडा विभागाचे मंत्री उपस्थित आहेत ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे खेळाडू नगर शहर आणि जिल्ह्यातून तयार होत आहेत. नव्या पिढीला क्रीडा सुविधा देण्यासाठी आपण राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या पाठिंब्याने निश्चित प्रयत्न करू. खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी केली.

Updated : 29 Aug 2021 11:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top