Top
Home > Max Political > Max Impact : मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष सुरु

Max Impact : मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष सुरु

Max Impact : मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष सुरु
X

राज्यात राष्ट्रपती राजवट असल्यानं मुख्यमंत्री (Chief minister) साहाय्यता निधीतून रुग्णांच्या उपचारासाठी पैसे मिळणं बंद झालं होतं. त्यामुळं अनेक रुग्णांच्या प्राण धोक्यात आले होते. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी बंद, पाच हजार रुग्णांचे प्राण धोक्यात' या आशयाचं वृत्त 15 नोव्हेंबरला प्रसारीत केलं होतं. या वृत्ताची तात्काळ देखल घेत राजकीय नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि उपाययोजना करण्याची विनंती केली.

त्यानंतर तात्काळ पाऊल उचलण्यात आली. मात्र, आज मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचार व शस्त्रक्रियेकरिता आर्थिक सहाय्य देण्याबाबत ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे. या संदर्भातील शासनाने आजच आदेश काढले आहेत.

सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार (ESIS Hospital Compound), गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई – ४०००१८, दुरध्वनी – ०२२-२४९९९२०३/०४/०५ या ठिकाणी गरजूंनी आपले अर्ज सादर करावेत, असं कळविण्यात आलं आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट ५८१ समान उपचार पद्धती वगळून उर्वरित आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याबाबत अर्जांची छाननी करतील. आवश्यक कागदपत्रे व पात्रता तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र अर्जांची शिफारस करेल. शिफारसपात्र अर्जानुषंगाने निधी वाटपाबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या समितीच्या सदस्यांकडून निर्णय घेण्यात येईल, असं शासन निर्णयात म्हटले आहे.

अर्जाची छाननी करण्याची कार्यवाही करण्याकरिता लागणारा अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी करावी, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अर्जांची स्वीकृती, छाननी इत्यादी कार्यवाही करावी, असेही निर्देशित करण्यात आलं आहे.

दरम्यान, काल निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या एका आदेशान्वये या यंत्रणेसाठी मंत्रालयीन संवर्गातील ४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा देण्यात आल्या आहेत. एक उपसचिव, एक कक्ष अधिकारी, एक सहायक कक्ष अधिकारी व एक लिपीक – टंकलेखक यांच्या सेवा या कामासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. इतर अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी करावी, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटलं आहे

Updated : 21 Nov 2019 3:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top