Top
Home > News Update > MaxMaharashtra Impact: खासदार पोहोचले आदिवासी पाड्यावर...

MaxMaharashtra Impact: खासदार पोहोचले आदिवासी पाड्यावर...

MaxMaharashtra Impact: खासदार पोहोचले आदिवासी पाड्यावर...
X

पालघर: जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यास यंत्रणेला भाग पाडण्याचे काम मॅक्स महाराष्ट्र सातत्याने करत आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांना शहराशी जोडणारा रस्ताच नसल्याचे वृत्त मॅक्समहाराष्ट्रने दाखवले होते. या वृत्ताची दखल पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली असून 30 सप्टेंबर ला या पाड्यांना भेट देऊन येथील परिस्थिती चा आढावा घेतला.

तसंच यावेळी बोलताना खासदार राजेंद्र गावित यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचं काम पुढच्या वर्षापर्यंत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर येथील आदिवासींना रोजगाराच्या सुविधा देखील उपलब्ध करून देणार असल्याचं गावित यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच वनविभागावाकडून या रस्त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे डीएफओ अमित मिश्रा यांनी सांगितले. यावेळी सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जव्हारपासून 25 ते 30 किमी अंतरावर डोंगर दऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयीसुविधा पासून कोसो दूर आहेत. स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून रस्त्याअभावी वृद्ध, गरोदर माता, शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.

जर पाड्यात कोणी आजारी पडलं तर सदर व्यक्तीला लाकडाची डोली करून 7 किलोमीटरचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील आरोग्य केंद्र गाठावे लागत आहे.

यावेळी खासदार गावितांनी मॅक्समहाराष्ट्र शी संपर्क साधून संसदीय अधिवेशन झाल्यावर त्या गावाला भेट देणार असल्याचे सांगितले होते. यावेळी खासदारांनी दिलेला शब्द पाळला असून या गावपाड्यांना भेट दिली व येथील समस्या जाणून घेतल्या तसेच रस्त्याचा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन दिल्याने येथील आदिवासी बांधवांनी खासदार गाविताचे व मॅक्समहाराष्ट्र चे आभार मानले आहेत.

Updated : 1 Oct 2020 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top