Home > News Update > मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
X

सांगली जिल्ह्यातील कमळापूर इथे दलित वस्ती सुधार योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार पुराव्यांनिशी करणाऱ्या सागर गोतपागर यांना पोलीस पाटील आणि ही कामे करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने धक्काबुक्की आणि धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस पाटील अविनाश साळुंखे आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टर भाऊ या दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसह धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी सागर गोतपागर यांनी एट्रॉसिटीअंतर्गत तक्रार दाखल करुनही पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.

दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कमळापुर इथे यावर्षी दोन कामे झाली. एक म्हणजे समाजमंदिर आणि दुसरे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे. पण समाज मंदिरातील निकृष्ट बांधकामाबाबत सागर गोतपागर यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह सांगली जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यावर त्यांनी विटा पंचायत समितीमार्फत चौकशी करून अहवाल मागवून घेतला. या अहवालामध्ये विटाच्या बिडिओंनी सर्व काही व्यवस्थित आहे, असा अहवाल दिला.

पण त्याचबरोबर या समाजमंदिरात स्टोअर रूम तसेच शौचालयाचे केलेले बांधकाम इथल्या लोकांनी स्वच्छता राहणार नाही म्हणून ठेकेदाराला पाडायला लावले, अशी माहिती ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांनी दिली. पण यामध्ये ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांनी ही माहिती कशाच्या आधारे दिली याबाबत त्या अधिकाऱ्यांकडे कायदेशीर पुरावा नव्हता. यानंतर सागर गोतपागर आणि इतर सहकाऱ्यांनी बहुतांश कुटुंबाकडे शौचालय आणि स्टोअर रुमला नकार दिला आहे का, याची विचारणा केली तेव्हा कुणीही विरोध केला नाही उलट या सोयी हव्यात असे हमीपत्र लिहून दिले. पण तरीही त्या मंदिरातील निकृष्ट कामाच्या बाबत कसलीही कारवाई झाली नाही.

या कामाचे कंत्राट थोरात नावाच्या ठेकेदाराच्या नावावर होते पण प्रत्यक्ष काम गावातीलच ठेकेदार राहुल साळुंखे याने केले. राहुल साळुंखे या पोलीस पाटील अविनाश साळुंखे यांचा भाऊ आहे. यानंतर गावात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम गावातीलच ठेकेदार राहुल साळुंखे यांना मिळाले. त्याच्या अंदाजपत्रकातील माहितीनुसार ज्या ठिकाणी हे काम नियोजित होते, त्याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम झालेले होते आणि नव्या पेव्हर ब्लॉकच्या कामात मात्र नव्याने काँक्रिट टाकून ब्लॉक बसवण्याची तरतूद करण्यात आली होती.

यानुसार जुन्याच कामावर पेव्हर ब्लॉक बसवून त्यात अपहार होणार असल्याचे लक्षात येताच ही बाब पुन्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली. तक्रार करणाऱ्यांच्या घराबाहेर पेव्हर ब्ल़क न बसवणे, त्याची लेव्हल न करणे असे प्रकार करण्यात आले. याबाबत कमळापूर ग्रामपंचायतीत अर्ज करण्यात आला. या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे पत्र बी डी ओ यांना पाठवल्याची माहिती ग्रामपंचायतीने पत्रासह दिली. असे असतानाही विटा शाखेच्या अभियंत्यांनी ठेकेदाराचे बिल काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला आक्षेप घेतला. यानंतर अतिरिक्त सीईओंनी चौकशीसाठी प्रतिनिधी गावात पाठवल्यानंतर त्या ठिकाणी पोलिस पाटील साळुंखे यांनी सागर गोतपागर यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

एवढेच नाहीतर ठेकेदार राहुल साळुंखे त्याच्या इतर साथीदारांसह तिथे आला आण त्यांने धक्काबुक्की केली. “दलित वस्ती सुधार योजना ही आमच्या हक्काची योजना आहे. या योजनेला ठेकेदाराच्या खिशात डायरेक्ट पैसे ट्रान्स्फर योजना बनवले आहे. या कामात असलेल्या घोटाळ्या विरोधात आम्ही या लढ्यात उतरलो आहोत. यामध्ये माझा जीव गेला तरी आम्ही लढू. यानंतर माझ्यावर बोगस खोटी तक्रार दाखल होऊ शकते, माझ्या जीवितास धोका झाल्यास याला संबंधित लोकांना जबाबदार धरण्यात यावे”, असे सागर गोतपागर यांनी म्हटले आहे.

Updated : 8 Aug 2020 3:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top