Home > News Update > महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र होईल हे झिंगलेल्या प्रवृत्तीचे लक्षण, सामनातून भाजपला टोला

महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र होईल हे झिंगलेल्या प्रवृत्तीचे लक्षण, सामनातून भाजपला टोला

राज्य मंत्रीमंडळाने सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्याने राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने जोरदार टीका केली होती. तर राज्य सरकारने या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा केला होता. मात्र आता सामनाच्या अग्रलेखातून भाजपला जोरदार टोला लगावला आहे.

महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र होईल हे झिंगलेल्या प्रवृत्तीचे लक्षण, सामनातून भाजपला टोला
X

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विविध विषयांवर भाजप आणि केंद्र सरकारला टोला मारण्याचे काम सुरू असते. त्यातच शनिवारच्या अग्रलेखात राज्य सरकारने घेतलेल्या सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाला भाजपने विरोध केल्याने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

केंद्र शासनाने वाईन उद्योगासाठी जाहीर केलेल्या धोरणानुसार वाईन पार्कमध्ये शेतकरी, छोटे उद्योजक आपले प्रकल्प सुरू करू शकतात. वाईन निर्मीती व विक्री करणे हे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणारे क्षेत्र असल्याचा दावा करत सरकारने वाईन विक्रीसाठी सुपर मार्केट खुले केले म्हणून महाराष्ट्र मद्यराष्ट्र होईल, असे बरळणे हे झिंगलेल्या प्रवृत्तीचे लक्षण आहे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला. तर विरोधी पक्षाने केलेल्या टीकेवरून हा महाराष्ट्राच्या संस्काराचा अपमान आहे, असे मत अग्रलेखात मांडले आहे.

दारू म्हणजे औषध आहे, थोडी थोडी पिया करो, असा सल्ला काही दिवसांपुर्वी साध्वी प्रज्ञासिंग यांनी दिला होता. त्यावर हे झिंगाडे काय बोलणार असा परखड सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, वाईन आणि दारू यातील फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहिती आहे. पण तरीही विरोधी पक्षाला वाईन चढली आहे. त्यामुळे ते सरकारच्या विरोधात बोंबा मारत आहेत, असे मत व्यक्त केले. तसेच राज्यातील सुपरमार्केट, मॉल यांच्यासह एक हजार चौरस फुट जागा असलेल्या किराणा मालाच्या दुकानांमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यावरून विरोध करणारा भाजप नवसारीची देशी दारू पिल्यासारखा बरळत आहे. तसेच सुपरमार्केटमध्ये वाईन मिळणार हा निर्णय महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करणारा आहे, असे बोंबलणे म्हणजे स्वतःच स्वतःच्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखे आहे, असे टोला लेखात लगावला आहे.

राज्यातील द्राक्ष बागायतदार, फलोत्पादन करणारे शेतकरी यांना फायदा व्हावा आणि वाईन उद्योगास चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यात नाक मुरडण्यासारखं ते काय? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस गोव्यातून हे बसून या निर्णयाला विरोध करत आहेत, हे आश्चर्यकारक आहे, असे मत सामनातून व्यक्त केले आहे.

भाजपशासित राज्यांनी मद्यविक्रीसंदर्भात मवाळ धोरण का घेतले, हे भाजप पुढाऱ्यांनी सांगायला हवे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा संदर्भ देत शेतकऱ्यांचे उत्पन्न दामदुप्पट करण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी म्हटले.

राज्यात फळबागांच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मतानुसार फळांची बाजारात आवक वाढत आहे. मात्र ही फळे नाशवंत असल्याने आणि या फळांसाठी आपल्याकडे प्रक्रीया उद्योग नाहीत. त्याचा तोटा शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे फळांच्या रसापासून वाईन निर्मीतीचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे या फळांचा वापर वाईन निर्मीतीसाठी करण्यात येईल. त्यातून फक्त महसुलातच वाढ होणार नाही तर त्याचा शेतकरी व फलोत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्षाने इतके बेबंद आणि बेधूंद होऊ नये, असे मत अग्रलेखात व्यक्त केले आहे. पुढे म्हटले आहे की, देशात 175 च्या आसपास वाईन प्रकल्प आहेत. त्यापैकी 70-75 महाराष्ट्रात आहेत. याबरोबरच मोदी सरकारने नाशिकला वाईन कॅपिटलचा दर्जा दिला आहे. मोदी सरकार नाशिकमध्ये वाईनचे ब्रँडिंग करण्यासाठी मदत करत आहे. वाईन क्लस्टर आणि वाईन टुरिझमला प्राधान्य मिळावे, यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हिंदूस्थानचे मद्यराष्ट्र करायचे आहे का, असा सवाल सामनातून व्यक्त केला.

सामनाच्या अग्रलेखाच्या उत्तरार्धात म्हटले आहे की, केंद्र सरकार हिंदूस्थानला मद्यराष्ट्र करत आहे, असे महाराष्ट्रातील भाजपवाले बोंबलणार आहेत का? तर पुढे म्हटले आहे की, भाजपशासीत राज्यांपैकी मध्यप्रदेशमध्ये होम बार लायसन्सला परवानगी देण्यात आली आहे. तर ज्यांचे उत्पन्न १ कोटी रुपये आहे ते घरीच बार उघडू शकतील, असा निर्णय घेत घरातील मद्यसाठा वाढवण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपची मंडळी त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील बेवड्यांना समर्पित करणार का? असा प्रश्न उपस्थित केला.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार वाईन पार्कमध्ये शेतकरी, छोटे उद्योजक आपले प्रकल्प सुरू करू शकतात. त्याचबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते की, वाईन हे पुर्ण अन्न आहे. तर वाईन निर्मीती क्षेत्र हे राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणारे क्षेत्र आहे. मात्र राज्य सरकाने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली की महाराष्ट्र मद्यराष्ट्र होईल, असे म्हणने झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे, असा टोला सामनातून लगावला आहे. तर हा महाराष्ट्राच्या संस्कराचा अपमान आहे. त्यामुळे दारू म्हणजे औषध म्हणत थोडी थोड़ी पिया करो, असा सल्ला देणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग यांना हे झिंगाडे काही बोलणार आहेत का? असा सवाल यावेळी केला आहे.

Updated : 29 Jan 2022 3:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top