Home > News Update > महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी 50 नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी 50 नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी 50 नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज
X

ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.






यावेळी उपस्थित टूर मार्गदर्शकांचे आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून प्रधान सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या, हे उमेदवार आधीच शहरस्तरीय टूर गाईड आहेत. त्यांना प्रशिक्षणाद्वारे आता राज्य स्तरावर पदोन्नती दिली जात आहे. पात्र आणि प्रमाणित पर्यटक मार्गदर्शकांची ही नवीन तुकडी पर्यटन स्थळांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी आणि अधिकाधिक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची शैली आणि नवीन तंत्रे जोडून राज्याचे सौंदर्य प्रदर्शित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन संचालनालयाद्वारे चालवलेला हा उपक्रम प्रमाणित मार्गदर्शकांची कमतरता भरून काढेल. आवश्यक प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी असलेले या नवीन पर्यटक मार्गदर्शकांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याबरोबरच महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळेल. अशा फलदायी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पर्यटन संचालनालयाचे त्यांनी अभिनंदन केले.





पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी प्रास्ताविक करताना सर्व प्रशिक्षित उमेदवारांची प्रशंसा करून आनंद व्यक्त केला. आतापर्यंत राज्यातील 15 वेगवेगळ्या ठिकाणी ऑफलाईन टूर गाईड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये एकूण 450 मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्यात आले असून ते सेवा बजावण्यासाठी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि, महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आयआयटीएफ सर्टिफिकेशन प्रोग्रामच्या यशस्वी उमेदवारांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.






नवीन उमेदवारांसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उमेदवारांना जबाबदार, शाश्वत, वारसा आणि साहसी पर्यटन यावर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर, महाराष्ट्रातील पर्यटनाच्या उपरोक्त विषयांवरील त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. त्यात ते उत्तीर्ण झाले. लवकरच ते राज्यस्तरावर टूर गाईडची कर्तव्ये पार पाडणार आहेत. या 50 उमेदवारांची अधिकृतपणे टूर मार्गदर्शक म्हणून घोषणा करण्यात आली असून ते महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांवर महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित मार्गदर्शक म्हणून सेवा प्रदान करतील. पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आभार प्रदर्शन केले. मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड आणि डेक्कन हेराल्डचे मृत्यूंजय बोस, स्नेहल मोकाशी, पुजा कथुरीया आणि इतरांना यावेळी महाराष्ट्र पर्यटनाचे मार्गदर्शक म्हणुन नियुक्तीपत्र देण्यात आले. टुरिझम गाईड असोसिएशनचेचे अध्यक्ष फरहान शेख यांनी यावेळी पर्यटन मार्गदर्शकांसाठी आयोजीत प्रशिक्षणासाठी पर्यटन संचालनालयाचे आभार मानले. पर्यटन संचलनालयाचे प्रशिक्षक योगेश निरगुडकर यांनी सुत्रसंचालन केले.

Updated : 27 Aug 2022 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top