विधान परिषदेचा धुराळा !: देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी…

राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर देखील संकट आलं होतं. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुकांना हिरवा झेंडा दाखवल्यानं राज्यात ९ जागांसाठी २१ मेला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे.

प्रत्येक पक्षाचं विधानसभेतील पक्षबळ पाहता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज येतो. एक जागा निवडून येण्यासाठी ३२ मतदानांची गरज (कोटा) आवश्यक आहे. त्यामुळं भाजपच्या ३ जागा सहज निवडून येऊ शकतात. मात्र, जर भाजपने चार जागा उभ्या केल्या तर भाजपला १२८ मतांची आवश्यकता आहे. मात्र, इतकं संख्याबळ भाजपकडं नाही.

भाजप १०५
शिवसेना ५६
राष्ट्रवादी काँग्रेस ५४,
काँग्रेस ४४,
बहुजन विकास आघाडी ३,
समाजवादी पार्टी – २,
एम आय एम – २,
प्रहार जनशक्ती – २,
मनसे – १,
माकप – १,
शेतकरी कामगार पक्ष – १,
स्वाभिमानी पक्ष – १,
राष्ट्रीय समाज पक्ष – १,
जनसुराज्य पक्ष – १,
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १ आणि
अपक्ष – १३

मात्र, ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कारण विधानसभा निवडणुकीपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात आय्यारामांना संधी दिली होती.

आता हेच आय्याराम भाजपसाठी डोकेदुखी ठरवू शकतात. हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते यांनी देखील लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिट्टी देत भाजपचं कमळ हातात घेतलं. आता हे दोनही पाटील विधानपरिषदेवर येण्यासाठी उत्सुक आहेत.
त्यातच भाजपचे चार दिग्गज नेत्यांना विधानपरिषदेवर येण्याची इच्छा आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे हे सध्या विधानपरिषदेवर येण्यास इच्छूक आहेत. आता या सर्वांना संधी देणं शक्य नसल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी वाढली आहे.

कोणत्या पक्षाच्या किती जागा रिक्त झाल्या? कोणत्या आमदारांची टर्म संपली…

भाजप: ३
१. स्मिता वाघ
२. अरुण अडसड
३. पृथ्वीराज देशमुख

राष्ट्रवादी:

१. हेमंत टकले
२. आनंद ठाकूर
३. किरण पावसकर

शिवसेना:
१. डॉ नीलम गोऱ्हे

कॉंग्रेस:

१. हरिभाऊ राठोड,
२. चंद्रकांत रघुवंशी (राजीनामा दिला आहे).

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी ३ जागा रिक्त झाल्या आहेत. तर काँग्रेसच्या २, शिवसेनेची १ जागा रिक्त झाली आहे. मात्र, विधानसभेत बदलेल्या समीकरणामुळे यात बदल अपेक्षित आहे.