Home > News Update > ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले पण घाबरु नका !

३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले पण घाबरु नका !

देशातील काही भागात कोरोना संसर्ग वाढला असताना दुसऱ्या कोरोना लाटेची शक्यता लक्षात घेऊन लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आदेशानं पॅनिक होण्याची गरज नसून आतापर्यंत घोषीत सर्व सवलती सुरुच असणार आहे.

३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले पण घाबरु नका !
X

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा आदेश मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीनं काढण्यात आला आहे. राज्यात टप्प्याटप्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. याबाबत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यातच दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे.

या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. ज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन कडक राबवण्यात येईल. ३१ डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे २०२० या वर्षात लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची शक्यता आजच्या आदेशानं मावळली आहे. दिल्ली व देशातील अन्य प्रमुख शहरात करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रातही करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून वेळीच खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. दिवाळीनंतर करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे लक्षात घेऊन तातडीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांतून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.


करोना निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. विमानतळावरही सशुल्क करोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे धार्मिक स्थळे खुली करताना तिथेही कठोर नियमावली ठेवण्यात आली आहे. त्यात आता लॉकडाऊनबाबतही अगदी सावध निर्णय सरकारने घेतला आहे, त्यामुळे नागरीकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच पालन करुन शासनाला सहकार्य करावे अशी सरकारची अपेक्षा आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे:

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
  • सामाजिक अंतर राखणं गरजेचं
  • सतत हात धुणे आवश्यक
  • चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
  • जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी
  • धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी
  • बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी

Updated : 2020-11-27T22:10:26+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top