देशात आणि राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मुंबईची जीवनवाहीनी असलेली लोकलसेवाही बंद करण्यात आली. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मर्यादीत स्वरुपात रेल्वे सेवा सुरु होती. त्यानंतर दोन आठवड्यापुर्वी राज्य सरकारने विनंती केल्यानंतर महीलांना रेल्वेसेवा सुरु करण्यात आली.
आता राज्य सरकारने रेल्वेला पत्र लिहुन लोकल सेवा एकाच वेळी सुरु न करता टप्प्याटप्प्याने सुरु कऱण्याचा इरादा व्यक्त केला आहे. तसंच यासाठी ठराविक वेळाही निर्धारित करण्यात आल्या आहेत. यानुसार अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारी व्यक्ती सकाळी पहिल्या ७.३० ची पहिली लोकल, तसंच ११ ते ४.३० आणि रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करु शकते.
अत्यावश्यक सेवेतील प्रवासी ज्यांच्याकडे अधिकृत क्यूआर कोड आहे तसंच ओळखपत्रासोबत अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारे सकाळी ८ ते १०.३० तसंच संध्याकाळी ५ ते ७.३० च्या दरम्यान प्रवास करु शकतात. याशिवाय प्रत्येक एका तासाने महिला विशेष लोकल धावणार आहे, असे राज्य सरकारचे नियोजन आहे. आता रेल्वे आणि रेल्वेबोर्ड राज्याच्या प्रस्तावावर काय निर्णय घेताहेत हे लवकरच स्पष्ट होणार आहे.