शिववडापावनंतर माऊली थाळी… शिवसेनेनं करुन दाखवलं

124
Shivsena

वाढत्या महागाईच्या काळात गोरगरिबांना, रस्त्यावर काम करणाऱ्या मजदूरांना दोन वेळचे जेवणही लवकर उपलब्ध होत नाही. अशा वेळी ही कामगार मंडळी वडापाव, मिसळपाव खाऊन आपला दिवस काढतात. जेवणाची थाळी घ्यायची म्हटंल की 50 ते 70 रुपये मोजावे लागतात. त्यात पोटाची भूक कशी भागवावी आणि पैसे काय कमवावे असा प्रश्न अनेक कामगार, मजदूरांना पडलेला असतो.

मात्र आता ही चिंता दूर होणार आहे कारण विधानसभा निवडणुकींच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामान्य जनतेला आश्वासन दिलं होत की कुणीही पैशांमुळे उपाशी राहणार नाही, म्हणून 10 रुपयांत सकस आणि पौष्टिक आहार आम्ही सुरु करणार असल्याचे सांगितले आणि ते करुनही दाखवले.

हे ही वाचा..

मुंबईतील मुलुंड साईधाम या भागात शिवसेनेकडून स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दहा रुपयात जेवणाचे आयोजन केले जाते. या माऊली थाळीत तीन चपाती, दोन वेगवेगळ्या पद्धतीची भाजी, डाळ, भात, गोड शिरा, अश्या पदार्थांचा समावेश केला जातो. तसेच या माऊली थाळीच्या पंगतीत कामगार, मजदूरांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळाली. वडापाव खाऊन आम्ही समाधान नसतो. पोट देखील भरत नाही, ह्या दहा रुपयाच्या जेवणामुळे आम्ही पोटभर जेवण करतो आम्ही मजदूर आहोत त्यामुळे बाहेर जेवण्यासाठी जास्त पैसे खर्च करायला जमत नाही.

अशा प्रतिक्रिया सामान्यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना दिल्या. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु झालेल्या या उपक्रमाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या जगदीश जैन यांनी सांगितले.

दहा रुपयांच्या माऊली थाळीचे उद्घाटन महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं असून यामागे कुणीही पैशांअभावी उपाशी राहू नये असा शिवसेनेचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या उपक्रमाला साध्य करण्यात संपूर्ण श्रेय स्वामी चॅरिटेबल ट्रस्टचं आहे. येत्या काळात महाराष्ट्रभर माऊली थाळी प्रसिद्ध होईल, असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

माऊली थाळी आहे तरी कशी आणि सामान्यांच्या काय आहे प्रतिक्रिया जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रसन्नजित यांनी