Home > News Update > NCB च्या कारवाईतील साक्षीदार किरण गोसावी विरोधात लुकआउट नोटीस

NCB च्या कारवाईतील साक्षीदार किरण गोसावी विरोधात लुकआउट नोटीस

NCB च्या कारवाईतील साक्षीदार  किरण गोसावी विरोधात लुकआउट नोटीस
X

मुंबई मध्ये क्रुझ ड्रग रेव्ह पार्टीवर २ ऑक्टोबर ला एनसीबी (NCB) कडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सह अन्य ८ जणांना अटक करण्यात आली होती. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक करताना किरण गोसावी व भाजप पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेउन गंभीर आरोप केले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा एनसीबीशी (NCB) काय संबंध आहे? असा सवाल उपस्थित करत ही कारवाई बनावट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांच्या उपस्थितीबद्दल एनसीबीला (NCB) सर्व स्तरातुन प्रश्न विचारले गेले. यावर NCB ने आर्यन खान ड्रग्जच्या प्रकरणामध्ये किरण गोसावी याला साक्षीदार बनवले आहे असं स्पष्टीकरण दिलं. परंतू एनसीबीचा साक्षीदार असलेल्या किरण गोसावी याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती आता उघडकीस आली आहे. तरूणांना परदेशात कामाला लावतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार या व्यक्तीने केला आहे. यानंतर आता क्रूज ड्रग्ज प्रकरणी NCB चा स्वतंत्र साक्षीदार असलेल्या किरण गोसावी याच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बुधवारी दिल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. लुकआउट नोटीशीनुसार एखाद्या व्यक्तीला देश सोडण्यास मनाई केली जाते.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याप्रकरणी माहिती देताना म्हटलं आहे की, "आम्ही २०१८ मध्ये फरसाखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी के. पी. गोसावीविरोधात लुकआउट सर्क्युलर नोटीस जारी केली आहे."

काय आहे किरण गोसावी फसवणुक प्रकरण?

किरण गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्याच्याकडून तीन लाख रुपये घेऊन किरण गोसावीने चिन्मयला मलेशियाला पाठवले होते. परंतू तेथे नोकरी न मिळल्याने तो भारतात परत आला आणि त्याने फरासखाना पोलिसांकडे २०१८ ला किरण गोसावी विरोधात तक्रार दाखल केली होती. किरण गोसावी याच्यावर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात किरण गोसावी फरार आहे. त्यामुळे आता फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध पुन्हा एकदा सुरू केला आहे.

Updated : 14 Oct 2021 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top