तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला: राजीव बजाज
X
“आपण अनेक कमतरता असलेल्या कठोर लॉकडाऊनच्या अंमलबजावणीचा प्रयत्न केला. त्यामुळेच आपल्याला दोन्ही पातळीवर नुकसान सहन करावं लागलं. कठोर आणि त्रुटीपूर्ण लॉकडाऊनमुळेच आजही कोरोना व्हायरस अस्तित्वात असेल. म्हणजेच लॉकडाऊनमुळे व्हायरसचा मुद्दा सुटला नाही. मात्र, अर्थव्यवस्था निश्चित उद्ध्वस्त झाली. आपण संसर्गाऐवजी जीडीपीच्या विकासदरालाच भुईसपाट केलं,” हे मत आहे प्रसिद्ध उद्योगपती राजीव बजाज यांचं.
आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीव बजाज यांच्याशी बातचित केली. तेव्हा त्यांनी मोदी सरकार ने चुकीच्या पद्धतीने लावलेल्या लॉकडाऊन मुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान झाल्याचं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी देशातील अर्थव्यवस्थेबाबत अर्थतज्ञ, उद्योगपती यांच्याशी चर्चा करत आहेत. आज त्यांनी ‘बजाज’ चे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी चर्चा केली.
“अनेक जबाबदार लोक जे घडतंय त्यावर बोलण्यास घाबरतात. अशा स्थितीत आपल्याला सहिष्णू आणि संवेदनशील राहण्यासाठी भारतात काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आशिया खंडातील अनेक देश कोरोनाविरोधात चांगलं काम करत होते. असं असताना आपण त्यांचं अनुकरण करण्याऐवजी पश्चिमेकडील इटली, फ्रांस, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचं अनुकरण केलं. पूर्वेकडील आशियातील देशांकडे लक्षच दिलं नाही. ”
पाश्चिमात्य देशांची नक्कल करत भारताने कठोर लॉकडाऊन केलं. याची मोठी किंमत भारताच्या अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली आहे. कोरोना नष्ट झाला नाहीच त्याऐवजी अर्थव्यवस्थाच नष्ट झाली. असं म्हणत प्रसिद्ध उद्योगपती राजीव बजाज यांनी केंद्र सरकार वर सडकून टीका केली आहे. काय म्हटलंय राजीव बजाज यांनी पाहा?