एका रुग्णाला दिले १४ रेमडीसीवीर इंजेक्शन, हॉस्पिटल सील
X
रुग्णावर उपचार करतांना कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला 14 रेमडीसीवीर इंजेक्शन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला हेता. त्यानंतर या संदर्भाच चौकशी करण्याचे निर्देश तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी दिले होते. यासंदर्भात पाच सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावरून सोमवारी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी हे हॉस्पिटल सील करण्याचे आदेश दिले. तसेच पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
खामगाव येथील लाईफ लाईन हॉस्पिटलने कोविड-१९ रूग्ण तपासणीसाठी शासकीय परवानगी घेतलेली नव्हती, तरीही रूग्णालयात कोविड रूग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून तहसीलदार शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना या हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी समिती स्थापन करुन हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. या अहवालात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या असून यामध्ये सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एका कोव्हिडच्या रुग्णाला १४ रेमडीसीव्हीर इंजेक्शन दिल्याचे समोर आले आहे. यावरून सोमवारी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी सदर हॉस्पिटल सील करण्यात यावे आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.