Home > News Update > कायद्याने न वागणाऱ्या 'या' नेत्यांवर कारवाई का नाही?

कायद्याने न वागणाऱ्या 'या' नेत्यांवर कारवाई का नाही?

राज्यात कोरोनाचे निर्बंध फक्त सामान्यांसाठी आहेत का, निर्बंध मोडणाऱ्या नेत्यांवर कारवाई का होत नाही?

कायद्याने न वागणाऱ्या या नेत्यांवर कारवाई का नाही?
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लॉकडाऊनची टांगती तलवार निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांची कठोर अंमल बजावणी सुरू झाली आहे. सामान्यांना पोलीस काठ्यांनी मारतानाचे व्हिडिओ मुद्दाम व्हायरल केले जात आहेत. यामुळे सामान्य लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत, असे शासनाला वाटते आहे. पण सरकारला आणि राजकारण्यांना खरंच जनतेच्या आरोग्याची काळजी आहे का असा प्रश्न काही नेत्यांच्या वागणुकीवरुन निर्माण झाला आहे.

मास्क लावला नाही म्हणून सामान्य नागरिकांना पोलिसांचा प्रसाद मिळतोय आणि वरुन दंडही भरावा लागतोय. काही ठिकाणी तर मास्क लावलेला आहे, व्यक्ती एकटी आहे तरीही पोलीस मारत असल्याची दृष्य दिसत आहेत. पण त्याचवेळी कोरोनाच्या नावाने राजकारण करणाऱ्या नेत्यांना मात्र आवर घालणे सरकारला का शक्य होत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात अनेक नेते आम्ही या निर्बंधांचे पालन करणार नाही असे छातीठोकपणे सांगत आहेत. पण त्यांच्यावर कारवाई मात्र शून्य आहे.

कोण आहेत निर्बंध मोडणारे नेते?

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर जाहीरपणे आपण मास्क वापरणार नाही असे सांगितले आहे. किंबहुना गेल्या काही दिवसात सार्वजनिक ठिकाणी देखील राज ठाकरेंनी मास्क न वापरल्याचे दिसले. सामान्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी राज ठाकरेंवर कारवाई का केली नाही, असा प्रश्न निर्माण होतो.



खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी तर चक्क विना मास्क क्रिकेट मॅच खेळल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेले. मात्र यावेळी राणा दाम्पत्याने कोरोना नियम धाब्यावर बसवून ठेवले होते. दोघांनी तोंडाला मास्क बांधले नव्हते तर सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले गेले नाही. एकीकडे अमरावती जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे पण मेळघाटमध्ये कोरोनाचा पादुर्भाव अल्प आहे. अशा परिस्थितीत आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्यासोबत गेलेले कार्यकर्तेही विना मास्क फिरत होते. त्यामुळे मेळघाटात कोरोना पसरण्याची भीती आहे.

अतुल भातखळकर, आमदार, भाजप

आणखी एक नेते म्हणजे भाजपचे आमदार अतुल भातखळकर, या महाशयांनी तर छातीठोकपणे कोरोनाचे नियम होळीत जाळल्याचे म्हटले आहे. "आम्ही परंपरा जपली, आम्ही श्रद्धेला बळकटी दिली, ठाकरे सरकारच्या फतव्याला केराची टोपली दाखवत आम्ही होळी साजरी केली". असे ट्विट त्यांनी केले आहे.




मंगलप्रभात लोढा, अध्यक्ष, मुंबई भाजप

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मालवणीमध्ये जाऊन विना मास्क होळी साजरी केल्याचा फोटोही भातखळकर यांनी ट्विट केला आहे.




निलेश लंके, आमदार, राष्ट्रवादी

पारनेर तालुक्यातील सुपे येथे एका खासगी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी कोरोनाबाधित रूग्णांची सुरेक्षाविना भेट घेतली. एवढेच नाही तर त्यांनी यावेळी फोटोसेशन सुद्धा केलं. काही रुग्णांनी लंके यांच्यासोबत सेल्फी सुद्धा काढला. त्यामुळे आपल्यासोबत लंके इतरांचा सुध्दा जीव धोक्यात घातला. पण त्यांच्यावर ना पोलिसांनी कारवाई केली, ना पक्षाने जाब विचारला.

हे नेते स्वत: कोरोनाचे नियम पाळत नाहीत त्यामुळे लोकही नियम पाळत नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या नेत्यांना कोरोना झाला तर त्यांना तातडीने बेड मिळू शकतो, पण सामान्यांना बेड मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे सामान्यांनी या नेत्यांचे अनुकरण टाळणे गरजेचे आहे. तर सामान्यांसाठी जो कायदा आहे तो नियम मोडणाऱ्या या नेत्यांना का नाही असा सवाल कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर यांनी विचारला आहे.




Updated : 30 March 2021 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top