Phone Tapping Scam : देवेंद्र फडणवीस यांची घरीच चौकशी होणार
X
राज्यातील मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात दाखल गुन्ह्या प्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सायबर विभागाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आता देवेंद्र फडणवीस यांना तिथे जावे लागणार नाहीये, तर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच ही चौकशी होणार आहे. देवेंद्र फ़डणवीस यांनी स्वत: तशी माहिती दिली आहे.
"सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात" असे फडणवीस यांनी ट्विट करुन जाहीर केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला मुंबई पोलिसांची नोटीस आल्याची माहिती दिली होती. आपण विरोधी पक्षनेते असल्याने आपण केलेल्या आरोपांबाबत आपल्याकडील माहितीचा स्त्रोत जाहीर न करण्याचा अधिकार आपल्याला आहे, असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2022
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते आणि मंत्र्यांच्या फोन रेकॉर्डिंगमधून बदल्यांमधील भ्रष्टाचार समोर आल्याचा आरोप केला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हे फोन टॅपिंग केले होते, पण गोपनीय असलेल्या या फोन टॅपिंगची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कशी पोहोचली, याचा तपास सध्या मुंबई पोलीस करत आहेत. दरम्यान ऱश्मी शुक्ला यांच्याविरोधात सरकारने गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व पुरावे आपण देशाच्या गृहसचिवांना देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे आपण केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआय तपास सुरू झाला. पण सत्य समोर येऊ नये यासाठी सरकारने एक एफआयर दाखल करुन आपल्याविरुद्ध चौकशी सुरू केली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
*गिरीश महाजन यांना अडकवण्याच्या कटाबाबत सीबीआयकडे तक्रार?*
दरम्यान गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी विशेष सरकार वकिलांनी रचलेल्या कटाचा भांडाफोड आपण केला आहे, तसेच सरकारने सीबीआयकडे चौकशी सोपवावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा केली. तसेच विधानसभा अध्यक्षांना सव्वाशे तासांचे फुटेज आपण दिले आहे, याव्यतिरिक्तही पुरावे आपल्याकडे आहेत, यामध्ये सरकारमधील अनेक मोठ्या नेत्यांची नावं येत आहेत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली. तसेच मागणी मान्य झाली नाही तर कोर्टात जाऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.