दुष्काळात तेरावा: चारकोप मध्ये लक्ष्मण भंडारी चाळीवर प्रशासनाचा वरवंटा
X
दुसऱ्या कोरोना लाटेचा संसर्ग वाढल्यानंतर सरकार एका बाजूला घरात राहा असा आवाहन करत असताना दुसऱ्या बाजूला मुंबईतील चारकोप गावातील लक्ष्मण भंडारी चाळीवर तहसीलदार बोरीवली, उप जिल्हाधिकारी तसेच वन विभाग यांच्या संयुक्त आदेशाने तोडक कारवाई करुन बेघर करण्यात आले आहे, असे आदेश बनसोडे यांनी सांगितले.
चारकोप गावातील लक्ष्मण भंडारी चाळीत तीन एकशे कुटुंब राहात होती. हे सर्व मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आहेत. हे सर्व जण गेल्या पंचवीस वर्षांपासून इथे राहात होती. आज आठवडा झाला या जनतेच्या डोक्यावर छप्पर नाहीय. एकीकडे कोरोनासारख्या साथीच्या काळात मुख्यमंत्री म्हणतात की घरात बसा. तर दुसरीकडे यांचेच प्रशासन लोकांना विस्थापित करतेय. बरं ही कारवाई करताना सगळे नियम धाब्यावर बसवून कारवाई करण्यात आली आहे. लोकांचे कोणतेही पुरावे न तपासता ही कारवाई करण्यात आली आहे.
आठवडा झाला यांच्या डोक्यावर छप्पर नाहीये. ही माणसे कोणत्या परिस्थितीत तिथे जगतोय याची तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही. जे नेते एवढी वर्षे मते मागायला येत होती ते सगळे गायब झालेत. कुणीही दखल घ्यायला तयार नाहीये. ना खायची सोय ना राहायची ना पाण्याची. पत्रकार, मीडिया यांनी देखील पाठ फिरवली आहे. हा शेवटचा प्रयत्न आहे. कृपया माणुसकीच्या नात्याने आमच्यावर झालेल्या अन्याय न्यायप्रिय व्यक्तीपर्यंत कृपा करून पोहचवा.
आमचं ठाम मत आहे की, अधिकाऱ्यांनी ही कारवाई बिल्डरांकडून रग्गड पैसा घेतल्याशिवाय केलेली नाहीये. या कारवाईची रीतसर चौकशी झाली पाहिजे. ही कारवाई म्हणजे संविधानातील कलम २१ चे जे जगण्याचा अधिकार देतं त्याचं सरळ-सरळ उल्लंघन आहे. सगळ्यांना राहायला घर आणि त्याबरोबरच्या मूलभूत सुविधा देण्याचं काम सरकारचं असताना सरकारच जर आम्हाला रस्त्यावर राहायला मजबूर करत असेल, तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? असा प्रश्न घर हक्क संघर्ष समिती चे विलास हिवाळे यांनी उपस्थित केला आहे.