Home > News Update > हरी नरकेंच्या उपचारात हलगर्जीपणा की षडयंत्र ? चौकशीची मागणी

हरी नरकेंच्या उपचारात हलगर्जीपणा की षडयंत्र ? चौकशीची मागणी

प्रतिक्रिया देण्यासाठी लीलावती रूग्णालयाकडून टाळाटाळ

हरी नरकेंच्या उपचारात हलगर्जीपणा की षडयंत्र ? चौकशीची मागणी
X

ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक हरी नरके यांचं आज ७० व्या वर्षी निधन झालं. मुंबईतल्या एशियन हार्ट हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, त्यांचा मृत्यू हा मुंबईतील प्रतिष्ठित अशा लीलावती रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं झालाय की त्यामागे षडयंत्र आहे याची चौकशी महाराष्ट्र सरकारनं करावी, अशी मागणीच नरके यांचे मित्र, लेखक संजय सोनवणी यांनी केलीय.

२२ जून २०२३ मध्ये हरी नरके आणि सोनवणी यांच्यात व्हॉट्सएप च्या माध्यमातून तब्येतीविषयी चर्चा झाली होती. त्यात नरके यांनी लीलावती रूग्णालयाच्या डॉक्टर्सनी त्यांच्या तब्येतीकडे कशाप्रकारे अक्षम्य दुर्लक्ष केलं, हे स्पष्टपणे म्हटलं होतं. ही संपूर्ण व्हॉट्सएप चॅटचा संजय सोनवणी यांनी सोशल मीडियावर शेअर केलीय.

सोनवणी यांनी केलेल्या मागणीसंदर्भात लिलावती हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रविशंकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यांच्या सहाय्यक असलेल्या श्रीमती डिसूझा यांनी सांगितलं.

संजय सोनवणी यांना हरी नरके यांनी व्हॉट्सएप वर पाठवलेला तो संदेश खालीप्रमाणे





“प्रिय भाऊ, नमस्कार

गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन

पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे.

आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता.

ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला.

मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो.

जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते.

हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.

लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले.

लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला.

regards.

[14:29, 22/06/2023] Hari Narke 2:





हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.

आता बरा होतोय.”





हलगर्जीपणा की षडयंत्र – संजय सोनवणी




हरी नरके यांना ह्रदयविकाराचा आजार असतांना त्यांच्यावर अस्थामा आजाराचे उपचार करण्यात आले. त्यामुळं मूळ आजार सोडून त्यांच्यावर इतर आजाराचे उपचार झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडत गेली. गुजरातच्या जामनगर ला दुसऱ्या डॉक्टरकडे उपचार केल्यावर त्यांना कळालं की, लीलावती इथल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं धोका वाढलाय. अस्थमाच्या उपचारांमुळं ह्रदयावर परिणाम झाला. लीलावतीच्या डॉक्टर्सना कसं कळालं नाही की त्यांच्यावर ह्रदयरोगाचे उपचार केले पाहिजेत, असा प्रश्नही सोनवणी यांनी उपस्थित केलाय. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा आहे की हे षडयंत्र आहे ? याची चौकशी महाराष्ट्र शासनानं करावी, अशी मागणीच संजय सोनवणी यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना केलीय. शिवाय या प्रकरणी लीलावती रूग्णालयाच्या दोषी डॉक्टर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल कऱण्याची मागणीही सोनवणी यांनी केलीय.

लीलावती रूग्णालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

संजय सोनवणी यांनी केलेल्या मागणी संदर्भात लीलावती रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रविशंकर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी रूग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर आम्ही फोन केला. त्यानंतर रिसेप्शनिस्ट यांनी डॉ. रविशंकर यांच्या स्वीय सहाय्यक असलेल्या डिसूझा नामक महिलेशी आमचा संपर्क करून दिला. डिसूझा यांनी सुरूवातीला हरी नरके यांची फाईल सापडत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आम्हांलाच नरके यांच्याविषयीचे डिटेल्स विचारले. त्यांनी विचारलेले डिटेल्स दिल्यानंतर डिसूझा यांनी आधी दुपारी चार वाजता फोन करा प्रतिक्रिया देते असं सांगितलं. त्यानंतर दुपारी चार वाजता डिसूझा यांना फोन केला त्यावर पुन्हा पाच वाजता फोन करायला सांगितलं. पाच वाजता फोन केल्यानंतर रिसेप्शनिस्ट यांनी डिसूझा ड्यूटीवरून गेल्याचं सांगत डॉ. रविशंकर यांच्याकडे फोन ट्रान्सफर केला. त्यानंतर डॉ. रविशंकर यांनी पराग नावाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर दिला आणि तेच प्रतिक्रिया देतील असं सांगितलं. पराग यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, तुम्ही त्यांचे सर्व डिटेल्स व्हाट्सएपवर पाठवा. त्यानुसार पराग यांना सर्व डिटेल्स पाठवले आणि विचारणा केली की, कधीपर्यंत यासंदर्भात प्रतिक्रिया मिळेल. त्यावर मला ही सगळी घटना समजून घ्यावी लागेल, असं उत्तर त्यांनी दिलं. सगळ्या गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असतांना प्रतिक्रिया देण्यासाठी लीलावती रूग्णालय टाळाटाळ करत असल्याचं स्पष्ट होतंय.

Updated : 9 Aug 2023 12:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top