Home > News Update > भदंत सदानंद महाथेरो अनंतात विलीन

भदंत सदानंद महाथेरो अनंतात विलीन

भदंत सदानंद महाथेरो अनंतात विलीन
X

आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी केळझरमधील धम्मराजिक महाविहार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झालेल्या धम्म दीक्षा सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत भदन्त सदानंद महाथेरो यांनीसुद्धा धम्म दीक्षा घेतली होती. त्यावेळी धम्म दीक्षा घेतलेल्या चार भिक्खुंपैकी हे एक होते. भन्ते सदानंद यांनी साठ वर्षांपासून भारतासह जगातील विविध देशात बौध्द धम्माच्या प्रसार व प्रचार करण्याचे काम केले. सिध्दहस्त लेखक म्हणून भदंत सदानंद यांनी धम्म या विषयावर विपुल लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या एकूण १८ ग्रंथांमध्ये मिलिंद प्रश्न, बुद्धगया मुक्ती, अनागारिक धर्मपाल, बुद्धाचे धम्मदूत आणि बौद्ध संस्कार पाठावली ही काही उल्लेखनीय पुस्तके आहेत.

भदन्त सदानंद महाथेरो यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९३९ रोजी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील इटगाव (कुर्झा) येथे गणवीर कुटुंबात झाला होता. त्यांची प्रवज्या व उपसंपदा भदन्त डी. सासनश्री यांच्या हस्ते महाबोधी विहार, सारनाथ येथे झाली होती. १९६६ मध्ये वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे विहारभूमीसाठी बेमुदत उपोषण करून धम्मराजिक महाविहार निर्मिती करून भारतीय बौद्ध सेवा संघ ही संस्था त्यांनी स्थापन केली. ते संघानुशासक होते. १९८१ला पाली विनय मुखोद्गत केल्याबद्दल बंगालमधील बिनागुंडी येथे त्यांना सद्धम्मादित्य उपाधीने विभूषित करण्यात आले होते.

Updated : 5 Aug 2020 8:18 PM IST
Next Story
Share it
Top