Home > News Update > मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला RFOची वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला RFOची वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला RFOची वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
X

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आङे. चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. गुरूवारी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते आहे. दिपाली यांनी मेळघाट वनक्षेत्राचे संचालक रेड्डी यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. आपण गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, असे त्यांनी या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकऱ्यांसमोर आणि कर्मचाऱ्यांसमोर अश्लील शिविगाळ करतात, रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलावतात, आपल्याशी अश्लील वर्तन करतात असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. त्याचबरोबर आपण गर्भवती असल्याने ट्रेकला येऊ शकत नसल्याचे सांगूनही शिवकुमार यांनी आपल्याला 3 दिवस कच्च्या रस्त्यांवरुन फिरवले. यामुळे आपला गर्भपातही झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवकुमार हे जाणूनबुजून आपला छळ करत आहेत. वारंवार वरिष्ठांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे अखेर नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. आपल्या मृत्यूनंतरचे सर्व लाभ आईला देण्यात यावेही असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र रेंजर फॉरेस्ट असोसिएशन तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे.

Updated : 26 March 2021 3:39 AM GMT
Next Story
Share it
Top