Top
Home > मॅक्स रिपोर्ट > मोदींची लसीकरणाची घोषणा, लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यासाठी आहे का?

मोदींची लसीकरणाची घोषणा, लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यासाठी आहे का?

".. आणि मला बाजीराव म्हणा'' देशात लसीचा तुटवडा असताना मोदींनी 1 मे पासून 18 वर्षापुढील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थिती लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या लोकांना काय देणार? वाचा ग्राउंड झिरोवर नक्की काय आहे परिस्थिती

मोदींची लसीकरणाची घोषणा, लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यासाठी आहे का?
X

सध्या राज्यात 45 वर्षापुढील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लोकांच्या रांगा लागल्या असून या रांगेत सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे. चेंबूरमधील महानगरपालिकेच्या 'मॉ' हॉस्पिटलमध्ये लोकांनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

या संदर्भात लसीसाठी आलेल्या एका महिलेने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना मी लस घेण्यासाठी आले होते. आम्हाला 1 वाजता बोलावले होते. मी 12 वाजताच आले. आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे. मात्र, आज लस मिळाली नाही. या ठिकाणी सोशल डिस्टसिंग ठेवलं जात नाही. असं सदर महिलेने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.फोटो मध्ये दिसणाऱ्या आजीचं वय 75 ते 80 वर्षाचं असेल. त्या गेल्या दोन दिवसांपासून चेंबूरच्या 'मा' हॉस्पिटलला लसीकरणासाठी येतात. आज त्यांचा नंबर लागला आहे. दोन दिवसांपासून सकाळी 7 वाजता घरुन निघतात. आणि इथं 7:30 ते 8 वाजता पोहोचतात. आज त्यांचा नंबर लागला. त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. आजीला जेव्हा त्यांचं नाव विचारलं तेव्हा आजी म्हणाल्या...

नाव काय विचारतोय...

सकाळ पासून बसलीय, आता 11 वाजले. अजून काही खालेले नाही.

अजुन किती वेळ लागेल हे ही माहिती नाही.

हात पाय गळाले आहेत. सकाळी उठून इथं यावं लागतं. ऑनलाईन काय ते करायचं... म्हताऱ्या माणसाला जगण्यासाठी त्रास देतात का? मरण्यासाठी कळत नाही. हे एवढे लोक तोंडाला बांधलं. पण अंतर काही नाही. कसं करणार... ही गर्दी लसीसाठी आहे का? कोरोनासाठी हे कळत नाही. जगण्यासाठी लस आवश्यक आहे म्हणून इथं येते. तुला गर्दी दिसत नाही का? अशा गर्दीत कशी लस घ्यायची. मरणं स्वस्त झालंय. या लोकाला. मास्क अर्धाच लावतात. जीवाला घोर नुसता...

अशा शब्दात त्या आजीनं आपला संताप व्यक्त केला.या गर्दी संदर्भात हॉस्पिटलचे डीन डॉ. संजय डोळस यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्यांनी आमच्याकडे पनवेल, ठाणे यासारख्या भागातून लोक लसीकरणासाठी येत आहेत. आमची 300 लसींची कॅपेसिटी आहे. तरीही आम्हाला जितके लसीचे डोस मिळतात. ते आम्ही देत आहोत. पुढे ही गर्दी होऊ नये. म्हणून खालच्या आवारातच मंडप टाकून लसीकरण केलं जाणार आहे. सध्या याची तयारी सुरु आहे.

अशी माहिती डॉ. संजय डोळस यांनी दिनांक 27 एप्रिलला मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना दिली होती. मात्र, आज 28 एप्रिलला हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. लोक येऊन परत जात आहेत. त्यामुळं येत्या 1 मे पासून 18 वर्षा पुढील व्यक्तींना लस कशी दिली जाणार असा सवाल उपस्थित होतो.

या संदर्भात आम्ही काही डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरुन सांगितलं की, सध्या लसीकरणाचा गोंधळच गोंधळ आहे.

मोदी सरकारने 1 तारखेपासून 18 वर्षापुढील लोकांना लस दिली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लस आहे का? अद्यापपर्यंत 45 वर्षापुढील लोकांनाच लस देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत 1 मे ला लसीकरण केंद्रावर किती गर्दी होईल. लोक लसीसाठी गर्दी करतील. ही घोषणा लसीकरणासाठी आहे की लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

1 मेला लस 45 वर्षावरील नागरिकांना द्यायची की 18 वर्षापुढील लोकांना...

कारण 45 वर्षावरील लसीचा दुसरा टप्पा अद्यापर्यंत पूर्ण झालेला नाही. त्यातच 45 वर्षातील लोकांची एवढी गर्दी आहे. पहिल्या डोसेसाठीच एवढी गर्दी आहे. दुसरे डोस घेण्यासाठी लोक यायचे आहेत. तुम्ही कोणत्याही सेंटरवर जा हीच परिस्थिती आहे. सरकारने लसीचं कसलंच नियोजन केलेले नाही. आणि आता 1 तारखेपासून 18 वर्षापुढील लोकांना लसीकरण जाहीर केलं आहे. त्यांना लसीकरण केंद्रावर बोलावून घेऊन सरकारला गर्दी करायची आहे का? हेच कळत नाही.

मेडिकल स्टाफने लसीकरण करायचे की कोरोना रुग्णांची सेवा...

लसीकरणासाठी सरकारने एक वेगळी यंत्रणा उभी करायला हवी. सध्या रुग्णालयातील स्टाफ तिकडे उभा केला जात आहे. या स्टाफने रुग्णालयातील रुग्णांची सेवा करायची की, लसीकरण करायचं हा मोठा प्रश्न आहे. लसीकरणासाठी सरकार या अगोदर लसीकरणाचा कार्यक्रम सांभाळणाऱ्या विभागाकडे हे काम देऊ शकते. त्या लोकांना योग्य ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. मात्र, हा लसीकरणाचा कार्यक्रम या स्टाफकडे दिल्यानं आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे.

45 वर्षापुढील लोकांना घरोघरी लस द्यायला हवी...

आत्तापर्यंत देशात अनेक लसीकरणाचे कार्यक्रम राबवले आहेत. आपल्याकडे लसीकरण करणारी यंत्रणा देखील आहे. त्यामुळं 45 वर्षापुढील लोकांना त्यांच्या घरी जाऊन लस द्यायला हवी. त्यामुळं संसर्ग टाळता येऊ शकतो. 45 वर्षापुढील लोकांना अनेक व्याधी असतात. त्यातच राज्यात दुसरी कोव्हिडची लाट सुरु असल्यानं या लोकांना अधिक धोका आहे. त्यामुळं या लोकांना थेट घरी लस देण्याची आवश्यकता आहे. या लोकांना घरातून बाहेर पडल्यानंतर लॉकडाऊन असल्यानं वाहन मिळत नाहीत. त्यातच संसर्गाची भीती देखील अधिक आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन

45 वर्षापुढील अनेक लोकांकडे मोबाईल नसतो. असला तरी साधा फोन असतो. त्यांना इंटरनेटचा वापर कसा करावा. याची माहिती नसते. त्यामुळं या लोकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सक्ती करु नये. ही सर्व लोक घरातील इतर लोकांना त्यांच्या नावाचं रजिस्ट्रेशनची विनंती करतात. तरी कोणी करत नाही. शेवटी काही हॉस्पिटल स्वत: या लोकाचं रजिस्ट्रेशन आल्यावर करुन घेतात. तर काहींना लसीकरण न केल्यानं परत जावं लागत आहे. त्यामुळं सरकारनं कमीत कमी या लोकाचं रजिस्ट्रेशन बंद करावं. अथवा रुग्णालयांना या वर्गाचं रजिस्ट्रेशन करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी केली जात आहे.

सरकारचं लसीकरणाबाबत कुठलंही नियोजन नाही...

सरकारचं लसीकरणाबाबत काय नियोजन आहे. सगळं काही रामभरोसे सुरु आहे. टाळा थाळ्या आणि टीका उत्सव अशी गोंडस नाव देऊन लसीकरण होणार आहे का? कोराना लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लसीचं आपल्याकडे नाहीत. हे सरकारला अगोदर करायला हवं होतं. लसीकरणाचं विभाग निहाय नियोजन हवं. राजकारणी मतदानाचं नियोजन बुथ निहाय करतात. मात्र, इकडे असं काही सुचत नाही. आपल्याला लस पुरवठा करणाऱ्या कंपन्या एवढी लस देणार आहेत का? याच गतीने लसीकरण सुरु राहिलं तर देशातील लसीकरणाला 1 ते 1.5 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार असल्याचं मत त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे. त्यामुळं सरकारनं अगोदर लसीची पुर्तता करुन हा कार्यक्रम जाहीर करायला हवा होता.

Updated : 2021-04-28T16:09:21+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top