Home > News Update > पुर्वनियोजनाअभावी कोकणात वारंवार पुरस्थिती, कोकण पूर नियंत्रण परिषदेत विचारांचे मंथन ; मॅक्स महाराष्ट्रचा अभिनव उपक्रम

पुर्वनियोजनाअभावी कोकणात वारंवार पुरस्थिती, कोकण पूर नियंत्रण परिषदेत विचारांचे मंथन ; मॅक्स महाराष्ट्रचा अभिनव उपक्रम

पुर्वनियोजनाअभावी कोकणात वारंवार पुरस्थिती, कोकण पूर नियंत्रण परिषदेत विचारांचे मंथन ; मॅक्स महाराष्ट्रचा अभिनव उपक्रम
X

कोकणात सातत्याने निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यामध्ये जाणारे शेकडो बळी? याला जबाबदार कोण? कोकण पुरस्थितीत सरकारची भूमिका, कोकणात पूर का येतो? पुरस्थिती कशी रोखायची? व्हिजन आणि उपाययोजना, कोकणातील पुरस्थिती आणि ग्राऊंड रिपोर्टींग, पूर, नैसर्गिक आपत्ती आणि मानसिक पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, पूर समस्या आणि पुनर्निर्माण आणि आव्हाने अशा विविध मुद्द्यांवर मंथन झाले. यामध्ये सरकार आणि प्रशासनाबरोबरच माध्यमांची भूमिका महत्वाची असते. मात्र पुरस्थितीच्या पूर्वनियोजनाअभावी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा सूर या परिषदेतून उमटला.

निसर्गसंपन्न असलेल्या कोकणात वारंवार पुरपरिस्थिती निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. दरवर्षी आपत्ती होऊन गेल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर करण्यात येते. मात्र ही पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून कोणती काळजी घेता येईल? याबरोबरच कोकण पूर नियंत्रण परिषदेचा उद्देश याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांनी प्रस्ताविक केले. यानंतर माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक अनुभव या परिषदेत मांडले. तसेच 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत पुरस्थिती निर्माण झाली असताना नाशिक जिल्ह्यात कोणत्या पध्दतीने प्रशासकीय नियोजन करण्यात आले? याविषयी चर्चा केली. यावेळी बोलताना महेश झगडे म्हणाले, कोकणातील पुरस्थिती निर्माण झाल्यानंतर शासकीय पातळीवरून निधीची आणि मदतीची तरतूद करण्यात येते. आपत्ती येण्यापुर्वी ज्यापध्दतीने नियोजन होणे आवश्यक असते. त्याकडे प्रशासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते. त्यामुळेच माध्यमांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायला हवेत. याबरोबरच आजही अनेक शहरांचे आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार नाहीत, यावरून महेश झगडे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. सरकारं बदलतात मात्र लोकांना सेवा देण्यासाठी असलेले प्रशासकीय अधिकारी कायम राहतात. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

कोकणात वारंवार पुरस्थिती निर्माण होण्यासाठी भौगोलिक परिस्थिती जितकी जबाबदार आहे. त्यापेक्षा अधिक पध्दतीने प्रशासनाची उदासिनता जबाबदार आहे. त्यामुळे आपत्ती येऊन गेल्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यापेक्षा आपत्तीपुर्व नियोजन केले तर शेकडो बळी जाण्यापासून वाचू शकतात, असं मत महेश झगडे यांनी व्यक्त केले.

या परिषदेत हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया यांनीही आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना किशोर धारिया म्हणाले, कोकणात पुरस्थिती निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगरावर होत असलेली वृक्षतोड कारणीभूत आहे. या वृक्षतोडीमुळे डोंगरावरील माती खाली वाहून येते. तो गाळ नदीच्या पात्रात साचल्याने पाणी तुंबते. त्यामुळे अनेकदा पुरस्थिती निर्माण होते. कोकणात काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही गाळ काढण्याचे काम करीत आहोत. त्यामुळे नदीपात्रातील गाळ काढला तर नदीचे पात्र मोकळे होईल आणि पाण्याला वाट मिळेल. त्यामुळे कोकणातील नद्यांच्या पात्रात साचलेला गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे मत किशोर धारिया यांनी व्यक्त केले. तसेच कोकणात पुरस्थितीनंतर मोठ्या प्रमाणावर लोकांकडून मदत पुरविण्यात येते. या मदतीमध्ये बिसलरीच्या बॉटल असतात. या अनेक बाटल्या पूर ओसरल्यानंतर तशाच नदीत वाहून जातात आणि पुढील वर्षी पूरासाठी कारणीभूत ठरतात, असंही धारिया यांनी सांगितले.

महेश सानप यांनी आपलं व्हिजन मांडताना सांगितले की, कोकणातील नद्यांची लांबी कमी आहे. त्यामुळे या नदीचे पाणी वाहण्याचे तीनही टप्पे वेगाने होतात. त्यामुळे कोकणात पुरस्थिती निर्माण होते. मात्र ही परिस्थिती रोखायची असेल तर आपत्ती पुर्व व्यवस्थापन करायला हवे. त्याबरोबरच कोकणात पुरस्थिती निर्माण होत असल्याने लोकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे महेश सानप यांनी सांगितले. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात कौस्तुभ बुटाला यांनी भूमिका मांडताना सांगितले की, ज्यावेळी कोकणात पुरस्थिती निर्माण होते. त्यावेळी या पुरस्थितीला सामोरे जाण्यासाठी अंतर्वस्रापासून ते वेगवेगळ्या औषधांची आवश्यकता भासते. त्याबरोबरच पुरग्रस्तांच्या घरात चिखल असल्याने त्यांना खाण्यासाठी अन्न पुरवणे आवश्यक असते. त्यानंतर दुसरा मुद्दा यावेळी उपस्थित होतो. तो मुद्दा म्हणजे आपत्तीच्या काळात संवाद प्रक्रीया बंद पडलेली असते. वीजपुरवठा विस्कळीत झालेला असतो. त्यामुळे पुरग्रस्तांच्या मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी फिरते जनरेटरची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात, असंही बुटाला यांनी सांगितले.

कोकण पूर नियंत्रण परिषदेच्या तिसऱ्या सत्रात कोकणातील पूर परिस्थिती आणि ग्राऊंड रिपोर्टिंग याविषयावर संवादक म्हणून मॅक्स महाराष्ट्रचे सहसंपादक रवींद्र चव्हाण यांनी परिसंवादाची सुरुवात केली. तर साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी प्रस्ताविक केले. यावेळी बोलताना प्रसन्न जोशी म्हणाले, ज्या पध्दतीने आपत्तीनंतर पुनर्वसन केले जाते. त्यामध्ये त्या भौगोलिक परिस्थितीला अनुरुप अशी घरं आहेत का? याचा विचारच होत नाही. त्यामुळे कोकणात सिमेंट काँक्रिटची घरं अतिपावसामुळे गळायला लागतात. त्यामुळे त्या वातावरणाशी सुसंगत घरांचं बांधकाम यामध्ये होणं आवश्यक आहे. त्याबरोबरच कोल्हापुर-सातारा-सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीमध्ये वृत्तांकन करताना आलेले अनुभव परिषदेत मांडले. यावेळी आपत्तीपुर्व आणि आपत्तीनंतर कसं नियोजन करायला हवं, याविषयी प्रसन्न जोशी यांनी भूमिका मांडली. तसेच कोणत्याही आपत्तीमध्ये प्रशासन आणि शासनाबरोबरच माध्यमांची भूमिकाही महत्वाची असल्याचे प्रसन्न जोशी यांनी सांगितले.

यावेळी लोकशाही न्यूजचे निसार शेख बोलताना म्हणाले की, आम्ही कोकणातील पुरस्थिती दरवर्षी पाहतो. कोकणातील लोक कितीही संकटं आली तरी हताश होत नाहीत. हे लोक लढाऊ वृत्तीचे आहेत. मात्र कोकणात चक्रीवादळं आणि पुरस्थिती आली होती. त्याचे पैसे अजूनही लोकांना मिळालेले नाहीत. सरकारने पैसे जाहीर केले होते. मात्र ते पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा, असं मत व्यक्त केले. तसेच कोकणातील पुरस्थितीचे वृत्तांकन करताना अनेकदा फीड पाठवताना अडचणी येतात. त्याविषयी निसार शेख यांनी भूमिका मांडली. त्याबरोबरच सरकारने पूर परिस्थिती निर्माण होण्यापुर्वी नियोजन करायला हवे, असंही निसार शेख यांनी सांगितले.

मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी सांगितले की, कोकणात अनेक मोठी धरणं आहेत. पण पावसाळ्यात पुरस्थिती आणि उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र कोकणात पुरस्थिती निर्माण झाल्यानंतर रिपोर्टिंग करताना संपुर्ण शरीर चिखलाने भरून जाते. यावेळी लोकांच्या मुलभूत समस्या सरकारपर्यंत पोहचवणे हिच माध्यम म्हणून आमची जबाबदारी असते. त्यामुळे माध्यमांनी सरकारवर सकारात्मक दबाव ठेवला पाहिजे, असंही यावेळी धम्मशील सावंत म्हणाले.

इंडी जर्नलच्या प्राजक्ता जोशी यांनी सांगितले की, आपत्तीनंतर वृत्तांकन करतांना लोक भावनिक झालेले असतात. ते पत्रकार म्हणून तुम्हाला खूप आदर देतात. स्वतःकडे खाण्यासाठी काहीही नसताना ते तुमच्यासाठी घासातला अर्धा घास देतात. याबरोबरच आपत्तीनंतर अनेकांचे संसार उध्वस्त झालेले असतात. यावेळी लोकांना तुमच्याशी खूप काही बोलायचं असतं. लोकांना मन मोकळं करायचं असतं, असंही प्राजक्ता जोशी म्हणाल्या. तसेच न्यूज 18 लोकमतचे वैभव घाग यांनीही कोकणातील पुरस्थितीसंदर्भात अनेक महत्वाच्या सूचना प्रशासन आणि सरकारला केल्या.

यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासकीय भूमिका मांडली. यावेळी बांगर यांनी कचऱ्यामुळे कशा पध्दतीने पुरस्थिती निर्माण होते. याबरोबरच प्रशासन आणि शासनाने नवनवे प्रयोग करून कशा पध्दतीने नियोजन करायला हवे, ते सांगितले. यावेळी बांगर म्हणाले, राज्याला साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिणारा लाभला आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. मात्र नियोजनाअभावी कोकणात सातत्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. मात्र यासाठी नियोजनाचा अभाव असल्याने शेकडो लोकांचा बळी जातो, असं मत व्यक्त केले. सरकार म्हणून खुर्चीत कोण बसतो, ते महत्वाचं नाही. मात्र जो त्या खुर्चीत बसतो. त्याच्यातला माणूस सामान्य माणसाला दिसायला हवा, असं मत सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मॅक्स महाराष्ट्रने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या परिषदेचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर तो रिपोर्ट मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवून त्यातील तरतूदी राबवण्याचा प्रयत्न करू, असं मत व्यक्त केले. तसेच आपत्ती कशा पध्दतीने येतात याविषयी डॉ. सतीश ठिगळे यांनी माहिती दिली. यावेळी मिलिंद पवार यांनी सांगितले की, शेकडो वर्षांपुर्वी जे जलव्यवस्थापन केले होते. तसेच वास्तुंची निर्मीती केली होती. त्याचा अभ्यास करून भौगोलिक परिस्थितीनुसार बांधकाम करायला हवे, असंही मिलिंद पवार यांनी सांगितले. या परिषदेत एकूण पाच सत्र पार पडले. यामध्ये आपत्ती पुर्व नियोजना अभावी कोकणात शेकडो जीवांचा बळी जातो. तसेच यामध्ये माध्यमांनी ही भूमिका समजून घ्यायला, हवी आणि प्रशासन आणि शासनापर्यंत पोहचवायला हवी, असे मुद्दे परिषदेतून पुढे आले. त्यामुळे आपत्तीपुर्व नियोजनावर भर देण्याची आवश्यकता ठळकपणे दिसून आली. या कोकण पूर नियंत्रण परिषदेचे आयोजन मॅक्स महाराष्ट्रने केले होते. या परिषदेसाठी सारस्वत बँकेने प्रायोजकत्व दिले. तर सहप्रायोजकत्व इन्फ्राटेक, डायसाण इन्फ्रा यांनी दिले. मीडिया पार्टनर म्हणून दैनिक सकाळ, इंडी जर्नल, दैनिक रामप्रहर, दि व्हाईस ऑफ मुंबई, मॅक्स वूमन या मीडियाने सहकार्य केले.

Updated : 16 Dec 2022 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top