Home > News Update > बसमधून 'ऐतिहासिक' प्रवास ; केडीएमटीची पर्यटन बस १७ ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार

बसमधून 'ऐतिहासिक' प्रवास ; केडीएमटीची पर्यटन बस १७ ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार

बसमधून ऐतिहासिक प्रवास ; केडीएमटीची पर्यटन बस १७ ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार
X

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांसह परिसरातील रहिवाशांना या दोन्ही ऐतिहासिक, सांस्कृतिक शहरांमधील प्रसिद्ध वारसास्थळांची समग्र माहिती मिळावी, या उद्देशातून कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने पर्यटन बससेवा मंगळवारपासून सुरू केली आहे. या उपक्रमात १७ ऐतिहासिक ठिकाणांची माहिती बस प्रवासातील आठ तासांत मिळणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे रहिवाशांना घराबाहेर पडता आले नाही. अनेकांना आपली पर्यटनाची हौस भागविता आली नाही. त्यांना ही बस म्हणजे एक पर्वणी आहे. कल्याण, डोंबिवलीतील अनेक रहिवाशांना आपल्या शहरात कोणती आणि किती प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे आहेत याची माहिती नाही. कल्याण-डोंबिवली व इतर परिसरामध्ये असलेल्या देवस्थान व पर्यटक कार्याची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेने पर्यटक बस सेवा सुरू केली असून या पर्यटकांच्या सेवेत २२ आसनांची बस उपलब्ध करण्यात आली आहे. या बसमध्ये प्रवास करण्यासाठी ४८ तास अगोदर तिकीट नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवाशांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बसफेरीची माहिती प्रवाशांना दिली जाईल. ही बस सकाळी ९ वाजता प्रवासाला सुरुवात करेल आणि सायंकाळी ५ वाजता या बसचा प्रवास संपेल. दिवसभरातील आठ तासांत ही बस ९० किलोमीटर धावेल. ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, सामाजिक संस्थांचे महिला, पुरुष कार्यकर्ते, सोसायटीतील कुटुंबीय, शाळा गटसमूहाने या बससाठी नोंदणी करू शकतात. ज्येष्ठ नागरिक आपला वाढदिवस आपल्या मित्रांसोबत पर्यटनस्थळे पाहताना साजरा करू शकतात. शाळा आपल्या विद्यार्थ्यांना या बसमधून फिरवून शहरातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देऊ शकतात. बाहेरून आलेल्या पाहुण्याला शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक ओळख करून देण्यासाठी रहिवासी या पर्यटन बसचा उपयोग करू शकतात.

Updated : 14 Oct 2021 5:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top