न्या. लोया यांच्या हत्येचे पुरावे फडणवीस सरकारने नष्ट केले, एड. सतीश उके यांचा आरोप
X
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणी आता पुन्हा एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. न्या. लोया यांचा नागपुरात झालेला मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप नागपुरातील एड. सतीश उके यांनी केला आहे. तसेच आपल्याकडे याबाबतचे सर्व पुरावे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करावा, अशी मागणी उके यांनी केली आहे. या प्रकरणात तशी शिफारस राज्य सरकारने करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सतीश उके यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
न्या. लोया यांच्या हत्येचे पुरावे तेव्हाच्या फडणवीस सरकारने दाबले, असा आरोपही उके यांनी केला. एवढेच नाही तर कोर्टातही खोटे पुरावे सादर करून फसवणूक केली गेली, असा आरोप त्यांनी केला आहे.
नागपूरचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर 9 डिसेंबर 2020 रोजी दाखल मर्म समरीत आपण हरकत याचिका दाखल केली असल्याची माहितीही उके यांनी या पत्रकार परिषदेत दिली. तसेच फडणवीस यांच्या कार्यकाळात कोर्टापासून लपवण्यात आलेले सर्व पुरावे नमूद करण्यात आले असून ते सर्व पुरावे न्यायालयाने गृहीत धरावेत अशी विनंती आपण केली असल्याचे सतीश उके यांनी सांगितले. एवढेच नाही तर न्या. लोया यांचे संशयास्पद प्रकरण आपण लावून धरत असल्याने आपल्या विरोधात अनेक खोटय़ा तक्रारी करण्यात दाखल आल्या आहेत, असा आरोपही उके यांनी केला आहे.