Home > News Update > काश्मीरमध्ये महिला पत्रकारावर UAPA अंतर्गत गुन्हा

काश्मीरमध्ये महिला पत्रकारावर UAPA अंतर्गत गुन्हा

काश्मीरमध्ये महिला पत्रकारावर UAPA अंतर्गत गुन्हा
X

सोशल मीडियावर भावना भडकवणाऱ्या पोस्ट आणि व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप करत काश्मीरमधील मुक्त पत्रकार मसरत जाहरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसरत यांच्यावर युएपीए अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय फोटो जर्नलिस्ट मसरत जाहरा यांच्यावर “कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, युवकांची जिहादी मानसिकता तयार करण्याच्या हेतूने या पोस्ट करण्यात आल्या आहेत आहेत”, असा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलीस काय म्हणाले?

'मसरत जाहरा' नावाच्या एका फेसबुक वापरकर्त्याने देशद्रोही पोस्ट गुन्हेगारी हेतूने अपलोड केली असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून मिळाली आहे. या फेसबुक वापरकर्त्याने अशी छायाचित्रे अपलोड केली आहेत, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांची प्रतिमा खिळखिळी करण्यासारखी पोस्ट अपलोड केली गेल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याचबरोबर देशविरोधीत कृत्यांचे उदात्तीकरण करुन देशाविषयी तरुणांच्या मनात द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

मसरत जाहरा काय म्हणल्या?

पोलिसांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात माझा उल्लेख फेसबुक युजर असा का केला? माझी पत्रकार म्हणून स्वतंत्र ओळख नाहीये का? मी एक पत्रकार म्हणून ग्राऊंडवर जे काम केले आहे आणि जे फोटो स्वत: घेतले आहेत, तेच अपलोड केले आहेत. यातील काही फोटो तर याआधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत. मी माझे काम करु नये का?

मसरत जाहरा या द वॉशिंग्टन पोस्ट, द न्यू ह्युमॅनिटेरियन, टीआरटी वर्ल्ड, अल जझीरा, द कारवां यासह अनेक प्रकाशनांसाठी जाहराने काम केले आहे. दरम्यान काश्मिर प्रेस क्लबने जाहरा आणि या भागातील इतर पत्रकारांवरील आरोपांचा निषेध करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली.

“देशात COVID-19 रोगाची पकड घट्ट होत आहे, त्याविरोधात आपल्याला एकत्र उभे राहण्याची गरज असतांना पोलिसांनी पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे आणि त्यांना त्रास देणे सुरू केले आहे.” अशी खंत काश्मीर प्रेस क्लबने व्यक्त केली आहे. दरम्यान एडिटर्स गिल्डनेही या कारवाईचा निषेध करत जाहरावर UAPA अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.

Updated : 22 April 2020 4:01 AM GMT
Next Story
Share it
Top