Home > News Update > जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी, खडसे समर्थकांमुळे वाद पेटला

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी, खडसे समर्थकांमुळे वाद पेटला

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी, खडसे समर्थकांमुळे वाद पेटला
X

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी उफाळून आली आहे. भाजपातून आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा गट सक्रिय झाल्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावान कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. सध्या महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांची गच्छंती होऊन त्यांच्या जागी खडसे समर्थकाची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

एकीकडे ही स्थिती असताना खडसेंसोबत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनाही आपल्या पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. विद्यमान महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याविषयी पक्षातील ज्येष्ठ मंडळींच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांपर्यंत या तक्रारी गेल्या आहेत. अशातच त्यांची विकेट पडण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जागी आपल्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी खुद्द खडसे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

अशोक लाडवंजारी यांचे नाव अग्रस्थानी...

कोण आहेत अशोक लाडवंजारी?

एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक असलेले अशोक लाडवंजारी हे खडसेंसोबत भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. ते भाजपचे माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष होते. त्यांना आता राष्ट्रवादीकडून महानगराध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. अभिषेक पाटील यांचा राजीनामा घेतला तर अशोक लाडवंजारी यांना संधी मिळू शकते.

या माध्यमातून खडसे गटाला न्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी करू शकतात. याशिवाय जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात नंबर एकचा शत्रू भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला पक्ष संघटन बळकट करावे लागणार आहे. लाडवंजारी यांना संधी देऊन राष्ट्रवादी ही चाल खेळू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.



Updated : 3 Jun 2021 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top