Home > News Update > पडळकर इन, जानकर आऊट?

पडळकर इन, जानकर आऊट?

पडळकर इन, जानकर आऊट?
X

भाजपने काल विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या ४ उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानंतर कोरोनाकाळातही राज्यातलं राजकारण ढवळून निघत आहे. भाजपने निष्ठावंतांना डावलून नवख्यांना संधी दिली अशा चर्चा आता रंगू लागल्यात. भाजपने विधान परिषदेसाठी गोपीचंद पडळकर यांना संधी दिलीय. पडळकर यांना जवळ करून भाजपने महादेव जानकर यांच्यासाठी पर्याय शोधल्याचं बोललं जातंय.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या अनेक आंदोलनांमध्ये गोपीचंद पडळकर यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. अनेक आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलंय.

पडळकर एकेकाळी महादेव जानकर यांचे समर्थक होते. २००९ मध्ये 'रासप'कडून त्यांनी खानापूर मतदारसंघात विधानसभा लढवली होती. त्यात ते पराभूत झाले, पण त्याच वेळेस वाढत गेलेल्या धनगर आरक्षण आंदोलनात त्यांचं नेतृत्व पुढे येत गेलं. २०१२ पासून ते आंदोलनात जास्त सक्रीय झाले.

२०१९ च्या लोकसभेवेळी सांगलीत भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत झाली होती. यात पडळकरांनी सुमारे ३ लाख मतं घेत राज्याचं लक्ष वेधलं होतं.

धनगर नेतृत्वाची गरज

भाजपच्या 'माधवं' या सामाजिक सूत्रानुसार प्रत्येक समाजातील नेतृत्व भाजपला हवं आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाचं मोठं प्राबल्य आहे. समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध असलेला हा समाज तुल्यबळ असा आहे. काही भागांमध्ये हा समाज भाजपचा पारंपरिक मतदारही आहे. त्यामुळे पक्षातून समाजासाठी एक चेहरा देण्याचा कायम प्रयत्न केला गेलाय.

महादेव जानकर आणि भाजप

राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राज्यभर संघटन करत असलेल्या महादेव जानकरांना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी हेरलं. त्यांच्यामागे पक्षाची सर्व ताकद उभी केली. २०१४ मध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत जानकरांनी तब्बल साडेचार लाख मतं मिळवली होती. सुप्रिया सुळे यांना २००९ मध्ये मिळालेलं साडेतीन लाखांचं मताधिक्य जानकरांनी ७० हजारांवर आणलं. जानकरांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावर निवडणूक न लढता आपल्या पक्षाच्या म्हणजेच रासपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. जानकारांनी हा हट्ट सोडला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

महादेव जानकर यांचा पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये जानकर भाजपसाठी धनगर समाजाचा चेहरा होते. जानकर आपल्या पक्षाच्या माध्यमातून भाजपसाठी मतं मागत होते. या सामाजिक समीकरणाचा भाजपला अनेक मतदारसंघात फायदा झाला.

... म्हणून नवीन नेतृत्वाचा विचार

महादेव जानकर हे मुंडे गटाचे आहेत. सध्या भाजप पक्ष संघटनेवर देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे घटकपक्षाची साथ घेण्याऐवजी आपल्याच पक्षातून नेतृत्व उभं केल्यास घटकपक्षाची गरज उरणार नाही आणि नेतृत्वही आपल्या नियंत्रणात राहील, असा विचार यामागे असू शकतो.

भाजपचे आणखी एक नेते राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात पराभव झाला. तेव्हापासून ते फारसे पक्षात सक्रिय नाहीत. त्यामुळे भविष्याचा विचार करून जनाधार असलेलं नवीन नेतृत्व तयार करण्याचा भाजपचा विचार असू शकतो.

पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात आणलं. त्यांना बारामतीतून लढण्याची ऑफर देतानाच विधान परिषदेचं वचन दिलं गेलं होतं. आता ते पूर्णही होत आहे. त्यामुळे जानकर यांच्याऐवजी भाजपसाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी गोपीचंद पडळकर काहीही सोयीचे आहेत.

Updated : 9 May 2020 9:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top