ही लोकशाही की घराणेशाही? पाहा धक्कादायक आकडे
X
कॉंग्रेस- राष्ट्रवादी या पक्षांवर पूर्वी घराणेशाहीची टीका व्हायची. घराणेशाहीचा मुद्दा विरोधी पक्षांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असायचा. या मुद्द्यावर सत्तेत आलेल्या भाजपमध्येही आता सर्रासपणे घराणेशाही फोफावली आहे. ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील घराणेशाहीचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये महाराष्ट्राची सत्ता ठराविक घराण्यांमध्येच बंदिस्त राहिल्याचे चित्र समोर आले आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघात सुमारे २३७ उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले उमेदवार होते. पक्षनिहाय घराणेशाहीचे उमेदवार आणि निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाची आकेवारी वाचा...
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार ही घराणेशाही विस्तारलेली आहे. ठराविक प्रशासकीय विभागावर विशिष्ठ घराण्याची राजकीय सत्ता राहिली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या घराणेशाहीच्या उमेदवारांच्या संख्येवर विभागानुसार एक नजर टाकूयात....
वर्षानुवर्षे एकाच कुटुंबात सत्ता असल्याचे चित्र फारसे नवे नाही. पण काका आणि पुतण्या हे राजकीय नाते बनलेल्या महाराष्ट्रात यावेळी बाप- मुलगा, बाप- मुलगी, भाऊ-भाऊ, बहिण-भाऊ इतकेच काय तर पती आणि पत्नी देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले होते. एकाच कुटुंबातून निवडणूक लढवणाऱ्या लोकशाहीच्या अमृतकाळातील हे वास्तव पाहा..
काही मतदारसंघात तर विरोधक पण एकाच घरातील होते. म्हणजे काहीही झालं तरी आमदारपद मात्र आपल्याच घरात येईल..
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या ऐनवेळी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष लढला. तर बातमी लिहीपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे नेते असलेले एकनाथ खडसे यांची सून भाजपच्या खासदार तर मुलगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विधानसभा उमेदवार होत्या. गणेश नाईक हे भाजपकडून तर मुलगा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार होता. विजयकुमार गावित भाजपा तर मुलगी अपक्ष उमेदवार होती. बीडमध्ये करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पती विरोधात पत्नीने निवडणूक लढविण्याचा घराणेशाहीचा नवा विक्रम होता होता वाचला...
२०२४च्या विधानसभा निवडणुकीतील घराणेशाहीच्या काही ठळक मुद्द्यांवर एक नजर टाकूयात..
२८८ मतदारसंघात एकूण २३७ उमेदवार घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेले उमेदवार
घराणेशाहीतून आलेले ८९ उमेदवार विजयी झाले.
६१ मतदारसंघात एकापेक्षा जास्त घराणेशाहीचे उमेदवार
५० मतदारसंघात २ पेक्षा जास्त घराणेशाहीचे उमेदवार
एका मतदार संघात ४ घराणेशाहीचे उमेदवार होते
राज्यातील ६१ मतदारसंघ हे दोन राजकीय घराण्यांमध्ये वाटले गेलेले आहेत.
घराणेशाहीच्या उमेदवारात राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार आघाडीवर.
दोन्ही शिवसेनेने दिलेले घराणेशाहीचे उमेदवार १९ टक्के मात्र पक्षाचे प्रमुख पद केवळ दोन घराण्यांच्याच हातात
दलबदलू उमेदवारांमध्ये घराणेशाहीतून आलेल्यांची संख्या जास्त
कोठेही तिकीट न मिळालेल्या घराणेशाहीतील ४२ उमेदवारांनी लढवली अपक्ष निवडणूक
भंडारा जिल्ह्यात एकही उमेदवार घराणेशाहीतला नाही
पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक घराणेशाही तर विदर्भ खानदेश मराठवाड्यात लक्षणीय संख्या
राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेतृत्वात घराणेशाहीचे आरक्षण १०० टक्के आहे. महाराष्ट्रात ही ठराविक घराणी सदासर्वकाळ सत्तेत राहिली आहेत. नेता वयस्कर झाला की त्याच्यानंतर त्यांची पुढील पिढीतील पाळण्यातील नेतृत्व काका, दादा, भैया, नाना, तात्या म्हणून जनतेच नेतृत्व करायला तयार झालेली असतात.
( सदर रिपोर्टमधील आकडेवारी हेरंब कुलकर्णी यांच्या रिसर्च मधून घेण्यात आली आहे.)






