आज होणार उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीचा फैसला!

Maharashtra cabinet recommends Governor to appoint Uddhav Thackeray as MLC

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेला घटनात्मक पेच सोडवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी तात्काळ मतदान घ्यावं अशी विनंती या पत्रात केली आहे.

यावर केंद्रीय निवडणूक आयोग उद्या 1 मेला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा बैठक घेणार असून या बैठकीत महाराष्ट्रात 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक घ्यायची अथवा नाही. यावर फैसला होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

काय आहे नक्की प्रकरण?

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात आली आहे. कारण कोणत्याही मंत्र्याला मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील दोन्ही सभागृहापैकी (विधानसभा आणि विधानपरिषद) सदस्य होणं गरजेचं असतं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 27 मे ला 6 महिने पूर्ण होत आहे. त्यामुळं निवडणूक होणं गरजेचं आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या संकटामुळं देशातील सर्व निवडणूका अनिश्चित काळासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं स्थगित केल्या आहे. त्यामुळं राज्यात 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी होणारी निवडणूक पुढं ढकलली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पद घटनात्मक पेचात अडकलं आहे.

यावर मार्ग म्हणून महाविकास आघाडी ने राज्यपाल कोट्यातील रिक्त असलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांची निवड करावी. असा ठराव मंत्रीमंडळाच्या बैठकीत दुसऱ्यांदा पार करुन राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, हा ठराव फेटाळल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात रिक्त झालेल्या 9 विधान परिषद जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात तीन वेगवेगळी पत्रं पाठवली आहेत. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत पाटील आणि काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिलं आहे. या सर्व पत्रांचा मजकूर जवळ जवळ सारखाच आहे. या तीनही नेत्य़ांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 27 तारखेच्या यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती या पत्राद्वारे केली आहे.

ते या पत्रात म्हणतात…

राज्यात होणाऱ्या ज्या 9 विधानपरिषद जागांच्या निवडणूका पुढं ढकलण्यात आल्या होत्या. त्या घेण्यात याव्यात. आम्ही कोणतीही गोष्ट लपवत आहोत. असं वाटू नये. म्हणून… आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या दोन कॅबिनेट बैठकांमध्ये उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त करण्याचे प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवले आहेत. मात्र, या प्रस्तावावर अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं घटनात्मक तरतुदींच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांचं निवडून येणं बंधनकारक आहे. नाही तर राज्यात या परिस्थितीत स्थिर असलेलं हे सरकार अनिश्चतेच्या भोवऱ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्व जनेतेने उद्धव ठाकरे यांच्या मागे विश्वास व्यक्त केलेला आहे. या सर्व राजकीय स्थैर्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. त्यामुळं या निवडणूका लवकरात लवकर घेण्यात याव्यात. आणि याची सर्व प्रक्रिया 27 तारखेच्या अगोदर पूर्ण होईल. असं नियोजन करावं.

असं पत्र महाविकास आघाडीच्या वतीनं केंद्रीय निव़डणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.