Home > News Update > जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पुरवठा थांबणार?

जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पुरवठा थांबणार?

जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पुरवठा थांबणार?
X

जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पाणी पुरवठा थांबवण्याचा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिला आहे. महापालिकेने थकबाकी न भरल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अभियंता दीपक डोंगरे यांनी दिली आहे. यासंदर्भात औरंगाबाद महापालिकेने शहरातील नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्यांनी पाणीपट्टी कर भरलेला नाही, त्यांचे नळ कनेक्शन कट करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे.

जलसंपदा विभागाने थकीत पाणीपट्टीबद्दल महापालिकेला नोटीस पाठवली आहे, तसेच पाणीपट्टी न भरल्यास २५ फेब्रुवारीपासून जायकवाडी धरणातील पाणीउपसा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 'शहराचा पाणीपुरवठा बंद होऊ दिला जाणार नाही. थकबाकीपैकी काही रक्कम जमा केली जाईल,' असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

शहरासाठी आवश्यक असलेले पाणी जायकवाडी धरणातून घेण्यासाठी महपालिकेला जलसंपदा विभागाला पाणीपट्टी भरावी लागते. परंतु, पालिकेने नोव्हेंबर २०१५ पासून पाणीपट्टी भरलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीची रक्कम २६ कोटी ३२ लाख २३ हजार रुपये झाली आहे. ही थकबाकी त्वरित न भरल्यास २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे.

Updated : 18 Feb 2022 2:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top