खासगी वाहतुकीचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश -परिवहन राज्यमंत्री पाटील
X
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. त्यातच एसटीच्या संपामुळे खासगी वाहतुकदारांनी या संधीचा गैरफायदा घेत आपले दर वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.एक प्रकारे प्रवाशांची लूटच सध्या सुरू आहे, त्यामुळे अशा खासगी वाहतुकीचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, वेतनवाढ मिळाली या आणि अशा इतर मागण्यांसाठी राज्यभर एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. ऐन दिवाळीच्या काळात हा संप सुरू असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आगे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास न होता आपले प्रश्न कसे मार्गी लागतील याबाबत एसटी कर्मचाऱ्यांनी विचार करावा असं मंत्री पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे फक्त त्यांनी सामंजस्य दाखवायला हवं असं त्यांनी म्हटले आहे.






