Home > News Update > "कोरोना रुग्णसंख्या वाढणे ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते"- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

"कोरोना रुग्णसंख्या वाढणे ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते"- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

कोरोना रुग्णसंख्या वाढणे ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
X

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. सोबतच, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. मात्र, असं असलं तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण त्या तुलनेत कमी असल्याने आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी काहीशी दिलासादायक बाब ठरली आहे. तरी लोकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरेंनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि शाळा-कॉलेजांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, "पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकतो. मात्र, नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. मात्र, विनाकारण घराबाहेर पडणे नागरीकांनी टाळले पाहिजे. ओमायक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षणं देखील दिसत आहेत. मात्र ते तसंच राहील का? याबाबत सविस्तर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे", असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, परिस्थिती गंभीर झाली तर मुंबईतील इमारती सील करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते, असंही ते म्हणाले, "दहा पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण कोणत्याही बिल्डिंगमध्ये आढळले, तर अशा इमारती सील करण्यात येतील. आत्ता आपल्याकडे ५४ हजार बेड उपलब्ध आहेत. बाहेरून येणारे किंवा आपल्याकडचे पॉझिटिव्ह हे जास्तीत जास्त लक्षणं नसलेले आहेत. तरीही आपण हलगर्जी करणं चुकीचं राहीलं", असं ते म्हणाले.

दरम्यान, ओमायक्रॉनबाबत समाज माध्यमातून फिरणाऱ्या संदेशांवरही त्यांनी निशाणा साधला. "सध्या व्हॉट्सअॅपवर ओमायक्रॉन गंभीर आहे, नाहीये असं सगळं सुरू आहे. पण हे सगळं आपण डॉक्टरवर सोडायला हवं. आपण किंवा व्हॉट्सअॅप ठरवायला लागलो की ओमायक्रॉन गंभीर नाही, तर ते चुकीचं आहे", असं ते म्हणाले.

सोबतच "शाळा, कॉलेज याबाबत आपण ट्रिगर लावलेले आहेत. ते हिट झाल्यानंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल. गरज पडली, तर पुढच्या आठवड्यात त्याविषयी निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल", असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Updated : 29 Dec 2021 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top