Home > News Update > उध्दव ठाकरे सरकारमध्ये विदर्भाचा दबदबा आणि प्रतिनिधीत्व घटलं

उध्दव ठाकरे सरकारमध्ये विदर्भाचा दबदबा आणि प्रतिनिधीत्व घटलं

उध्दव ठाकरे सरकारमध्ये विदर्भाचा दबदबा आणि प्रतिनिधीत्व घटलं
X

भाजप सरकारर सत्तेवरुन जाताच महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) च्या मंत्रिमंडळात विदर्भाचा वाटा कमी झाल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमध्ये विदर्भाच्या वाट्याला केवळ ८ मंत्रिपदं आली आहेत. फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात विदर्भाला झुकतं माप होतं. मुख्यमंत्रीपदासह या सरकारमध्ये विदर्भाच्या वाट्य़ाला एकूण १० मंत्रिपदं मिळाली होती.

हे ही वाचा...

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला (BJP) विदर्भात अभूतपुर्व यश मिळालं होतं. त्यांना ६२ पैकी ४४ जागा मिळाल्या आहे, त्यामुळे सत्तेतही विदर्भाला भरभरुन वाटा देण्यात आला होता. मंत्रिमंडळात एकट्या भाजपकडून सहा कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रिपदं देण्यात आली होती. तर शिवसेनेनं संजय राठोड यांना राज्यमंत्रिपद दिलं होतं. म्हणजे फडणवीस सरकारमध्ये विदर्भाला १० मंत्रिपदं मिळाली होती. या तुलनेत उध्दव ठाकरे सरकारमध्ये केवळ ८ मंत्रिपदं विदर्भाच्या वाट्य़ाला आली आहेत. यामध्य़े ७ कॅबिनेट मंत्रिपदं तर एका राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे.

फडणवीस सरकारमध्ये विदर्भाला केवळ मंत्रीपदच मिळाली नाही तर महत्वाची खातीसुध्दा मिळाली. मुख्यमंत्रीपद, गृह, अर्थ, वने, क़ृषी, नगरविकास, आदिवासी कल्याण, ऊर्जा, सामाजिक न्याय यासारखी महत्त्वाची खाती विदर्भाला मिळाली होती. विदर्भाचा अनुषेश भरुन काढण्यासाठी अत्यंत महत्वाची ही खाती होती. त्यातुलनेत उध्दव ठाकरे सरकारमध्ये महत्वाची खाती मुंबई, पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला जाणार आहेत. त्यामुळे विदर्भाच्या मंत्र्यांना कमी महत्वाची खाती मिळणार हे स्पष्ट झालंय.

विदर्भातून भाजपपाठोपाठ काँग्रेस ला (Congress) जनतेनं हात दिला होता. त्यामुळे काँग्रेसने सर्वात जास्त म्हणजे ४ मंत्रिपदं विदर्भाला दिली आहेत. तर राष्ट्रवादीने केवळ दोन तर शिवसेनेनं आपल्या कोट्यातून दोन मंत्रिपदं विदर्भाला दिली आहेत. यामध्ये काँग्रेसने यशोमती ठाकूर, सुनिल केदार यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख आणि राजेंद्र शिंगणे या नेहमीच्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर शिवसेनेनं केवळ संजय राठोड यांना राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटपदी बढती दिली आहे, तर आपल्या कोट्यातून बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपदी संधी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेनं (Shivsena) नेहमीप्रमाणे विदर्भाला फारसं प्रतिनिधीत्व न देण्याची परंपरा कामय ठेवली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील विदर्भाचे मंत्री

काँग्रेस

  • डॉ. नितीन राऊत
  • विजय वडेड्टीवार
  • सुनिल केदार
  • यशोमती ठाकूर

राष्ट्रवादी कॉग्रेस

  • डाँ. राजेंद्र शिंगणे
  • अनिल देशमुख

शिवसेना

  • संजय राठोड
  • बच्चू कडू

फडणवीस सरकारमधील विदर्भातले मंत्री

  • देवेंद्र फडणवीस- मुख्यमंत्री, गृह, नगरविकास
  • सुधीर मुनगंटीवार- वित्त, नियोजन, वने
  • डॉ. संजय कुटे- कामगार
  • डॉ. अशोक उईके- आदिवासी विकास
  • डॉ. अनिल बोंडे- कृषी
  • चंद्रशेखर बावणकुळे - उर्जा

राज्यमंत्री

  • मदन येरावार- MSRDC, पर्यटन
  • डॉ. रणजित पाटील – गृह
  • डॉ. परिणय फुके- आदिवासी विकास, वने

शिवसेना

  • संजय राठोड - महसूल, राज्यमंत्री

Updated : 30 Dec 2019 8:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top