Top
Home > News Update > प्रिन्सीची हत्या कोणी केली ?

प्रिन्सीची हत्या कोणी केली ?

प्रिन्सीची हत्या कोणी केली ?
X

प्रिन्सी २२ वर्षांची युवती. भांडुपला एका काॅल सेंटरला नोकरीत होती. त्यांचं इमारतीत नोकरीला असलेल्या एका युवकाशी तिचं नातं जुळलं आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण प्रिन्सीच्या वडिलांना तो पचनी पडला नाही. आपल्याकडे एक तर पुरूषप्रधान समाजव्यवस्थेत मुलींनी स्वत:च्या मर्जीने लग्न करावं, याला समाजमान्यता नाही. मुलीच्या कुटुंबाची तथाकथित इभ्रत धोक्यात येते. मुलीला जातीत लग्न करून दिल्यावर हुंड्यासाठी क्रूर छळ करून जाळलं तरी चालेल, पण मुलीने स्वत:च्या पसंतीचा मुलगा शोधता कामा नये.

त्यात प्रिन्सीने आणखी दोन पावलं पुढे टाकली होती. तिने पसंत केलेला "तो" मुलगा माणूसच होता, पण "वेगळ्या" धर्माचा होता. म्हणजे केवळ "घराणे की इज्जत"चाच नव्हे, तर एकूणच तथाकथित धर्म संकटात येणार होता. आपल्या देशातील सद्यस्थितीच्या दृष्टीने प्रिन्सी महाभयंकर असं पातक करायला चालली होती. भारतीय संविधानाने प्रिन्सीला पुरूषांसोबत समानाधिकार दिलेले होते. तिला व्यक्तिस्वातंत्र्य, निर्णयस्वातंत्र्य बहाल केलं होतं, पण तिच्या वडिलांनी ते रोखून धरलं होतं. एकतर ते वडिल होते, दुसरं म्हणजे पुरूषव्यवस्थेचे वाहक, तिसरं धर्मपुजक !!! यातल्या दोन गोष्टी प्रिन्सीच्या एक भारतीय स्त्री म्हणून विरोधातच होत्या आणि त्या पहिलीवर मात करणाऱ्या होत्या.

अगदी तसंच झालं. प्रिन्सीच्या वडिलांनी वडिलकीपेक्षा आपला धर्म महत्त्वाचा मानला. मुलगी आणि वडिल यांच्यात फार जिव्हाळ्याचं नातं असतं, असं म्हणतात, पण ते वडिलांचं तथाकथित नाक कापत नाही तोवरच. प्रिन्सीने तर अख्खा धर्मच बुडवायला घेतला होता. वडिल धर्माला जागले आणि त्यांना सभोवतालाने जो आदेश दिला, त्यानुसार त्यांनी प्रिन्सीला शांतपणे विष पाजलं. तिचं शीर कापलं. शरीराचे तुकडे केले. हे करताना त्यांचा ना वडिलधर्म आडवा आला, ना पित्याचं ह्रदय पिळवटलं, ना धर्माच्या तथाकथित शिकवणीने त्यांचे हात थरथरले. वरचढ ठरलं जातवर्चस्व. मेंदूवर स्वार झाला धर्मद्वेष. झुंडींच्या उन्मादी घोषणा, विकृत चित्कार, झुंडींना पाठीशी घालणारं घाणेरडं राजकारण आणि या सगळ्यात आनंद शोधणारी भेसूर समाजव्यवस्था यांची प्रिन्सीच्या हत्येला मान्यता होती. प्रिन्सीच्या वडिलांनी तिची हत्या करून एक तथाकथित धर्मकार्यच केलं होतं.

होय, हे धर्मकार्यच आहे या देशात. हा अत्याचार नाही समजला जात. ही धर्माने सुनावलेली सजा आहे. ही हत्या नाही, तर हा धर्मयज्ञात दिलेला बळी आहे. आजुबाजूच्या दहा लोकांना विचारा. ते सांगतील, प्रिन्सीचा बाप निर्दोष आहे. मुलीवर बलात्कार करणारा बाप नराधम असतो, पण मर्जीविरूध्द लग्न करणाऱ्या मुलीचे तुकडे करणारा बाप पुण्यवान ठरतो. अशा शेकडो मुलींचे तुकडे झाले तरी चालतील, पण धर्म टिकला पाहिजे. सद्या देशात माणसांपेक्षा धर्मरक्षण प्राधान्यावर आहे. स्वाभाविकत: बाई असुरक्षित होते. गाईचे तुकडे केले तर झुंडी तुमच्या घरात घुसून तुम्हाला झोडपतील, भोसकतील, कापतील, जाळतील, पण पोटच्या मुलीचे तुकडे करणाऱ्या प्रिन्सीच्या बापाचे उद्या जामीनावर बाहेर आल्यावर जागोजागी हारतुरे घालून सत्कार झाले आणि समाजमाध्यमात त्याची बाजू उचलून धरणारे निर्लज्ज संदेश फिरू लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ही नीच प्रवृत्ती हीच हळुहळू भारताची ओळख होत चाललीय.‌

Updated : 12 Dec 2019 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top