डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्तावाला मंजुरी
X
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक्सचे वर्चस्व असलेल्या प्रतिनिधीगृहात ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्याला ट्रम्प जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधात हा महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता.
डेमोक्रॅटिक्सचे वर्चस्व असलेल्या House of Representatives मध्ये १९७ विरुद्ध २३२ मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाच्या १० सदस्यांनीही प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात आता पक्षांतर्गत नाराजीही उघड झाली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या एकाच कारकिर्दीत दुसऱ्यांदा महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत. आता सिनेटमध्ये १९ जानेवारी रोजी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे.






