विदर्भातील शेतकऱ्यांवर संकटांची ‘टोळधाड’
X
एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतकऱी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असताना आता विदर्भातील शेतकऱ्यांपुढे नवीनच संकट उभे ठाकले आहे. अचानक टोळधाड आल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ही टोळधाड मध्य प्रदेशातून सातपुडा पर्वत मार्गे विदर्भात आली आहे. अमरावतीमधील मोर्शीत आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साहूर, वडाळा, अंतोर, खंबीत बेलोर, किनाळा या गावांमध्ये टोळधाडने आक्रमण केले. ही टोळधाड सर्व प्रकारच्या झाडांची पाने खाऊन फस्त करतात. झाडाला केवळ खोड,काड्याच शिल्लक राहतात.
या टोळधाडीचा सगळ्यात जास्त फटका हा संत्री, मोसंबी, लिंबू या फळ झाडांना आहे. या किडीमुळे जिल्ह्यातील आष्टी परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आधी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात 1970-72 च्या दरम्यान टोळधाडचे आक्रमण झाले होते. त्या वेळेस उपाययोजना म्हणून शासनाने वरून हेलिकॉप्टर द्वारे फवारणी केली होती. त्यांनतर पन्नास वर्षानंतर पुन्हा तालुक्यात टोळधाड चे आक्रमण झाले आहे.
ही कीड येणाऱ्या त्यांच्या मार्गातील झाडांची हिरवी पानं, फुलं, फळ, बिया, फांदी, पालवी सगळ्यांचा फडशा पाडत असल्याने फळबागांचे नुकसान करत आहे. शेतात धूर करणे, पिंप, डफ वाजवणे, फटाके फोडून शेतकरी या टोळधाडीपासून पिकं वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनामुळे कापूस, तूर, हरभऱ्याला भाव नसल्याने नुकसान झाले आहे. त्यात या संकटाची भर पडली आहे. सरकारने याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. कृषी विभागाकडून पाहणीला सुरूवात झाली आहे.







