Home > News Update > मुसळधार पावसाने उत्तराखंड आणि केरळमध्ये हाहाकार

मुसळधार पावसाने उत्तराखंड आणि केरळमध्ये हाहाकार

मुसळधार पावसाने उत्तराखंड आणि केरळमध्ये हाहाकार
X

डेहरादून : उत्तराखंड आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये गेले काही दिवस पावसाने हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागात आणखी ३० जणांचे बळी गेले आहेत. कुमाऊँ भागात घरे जमीनदोस्त झाली,अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले गेले आहेत. अल्मोडा, नैनिताल आणि उधमसिंहनगरमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. पावसाने गेलेल्या बळींची एकूण संख्या आता ३४ वर पोहचली आहे. जवळपास ३०० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नैनितालकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवर सतत दरड कोसळत असल्याने या शहराचा इतर जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे नैनिताल आणि काठगोदाम दरम्यान असलेला रेल्वेमार्ग वाहून गेला आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पुरात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला ४ लाख तर घराचे नुकसान झालेल्यांना १.९ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

तिकडे केरळमध्ये गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या पावसात एकूण ३८ जणांचे बळी गेले आहेत. राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो घरे व दुकांनांचे नुकसान झाले आहे. १ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळमध्ये १३५ टक्के अतिरिक्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये २० ऑक्टोबरपासून पावसाचा आणखी एक टप्पा सुरू होणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने म्हटले आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम,कोट्टायम, पठानमथिट्टा,मलप्पुरम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, कोझीकोड, वायनाड, कन्नूर आदी १२ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Updated : 20 Oct 2021 3:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top